नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल तब्बल ९० दिवसांनी २७ फेब्रुवारीला जाहीर झाला. तर मुख्य परीक्षा २९ मार्चला होणार आहे. त्यामुळे निकालानंतर मुख्य परीक्षेसाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. निकालानंतर मुख्य परीक्षेसाठी किमान ४५ दिवसांचा अवधी मिळावा असा नियम आहे. असे असतानाही आयोगातील प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका उमदेवारांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आयोगाच्या सचिवांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

परीक्षा नियमांमध्ये बदल

‘एमपीएससी’कडून राज्यसेवा परीक्षा नियमांमध्ये बदल करण्यात आला. यानुसार पहिल्यांदाच राज्यसेवा २०२५ ही वर्णनात्मक पद्धतीने होत आहे. परीक्षा नियमानुसार, निकालानंतर किमान ४५ दिवसांचा अवधी मिळणे आवश्यक असते. यामुळे उमदेवारांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक तो वेळ मिळतो. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे निकालाला उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. तसेच आता मुख्य परीक्षा विलंबाने घ्यावी, अशीही मागणी होत आहे. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून गप्प होते.

विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी उरणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थी करीत आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ‘वर्णनात्मक पद्धत’ लागू करण्यामागील एक मुख्य उद्देश मराठी विद्यार्थ्यांचा ‘यूपीएससी’मधील टक्का वाढवणे हा होता. मात्र, दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात ताळमेळ नसल्यास हा उद्देश साध्य होण्यात अडचणी येत आहेत. जर एमपीएससी मुख्य परीक्षा आणि यूपीएससी पूर्व परीक्षा यांच्या तारखा जवळ असतील, तर विद्यार्थ्यांची ओढाताण होते. अभ्यासाचा समतोल: मुख्य परीक्षेच्या सखोल लेखी सरावात गुंतलेला विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही.

कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये

राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही नियोजित असतात. त्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेले असते. त्यामुळे प्रामाणिकपणे ‘एमपीएससी’ची तयारी करणारे विद्यार्थी हे मुख्य परीक्षेची तयारी आधीच सुरू करतात. कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन नये, या भावनेतून तूर्तास परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.