नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल तब्बल ९० दिवसांनी जाहीर झाला. तर मुख्य परीक्षा २९ मार्चला होणार आहे. त्यामुळे निकालानंतर मुख्य परीक्षेसाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
परीक्षा नियमानुसार, निकालानंतर किमान ४५ दिवसांचा अवधी मिळणे आवश्यक असते. यामुळे उमदेवारांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक तो वेळ मिळतो. मात्र, एमपीएससीच्या दिरंगाईमुळे निकालाला उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. तसेच आता मुख्य परीक्षा विलंबाने घ्यावी, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे तीन दिवसांनी एमपीएससीमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून परीक्षेच्या तारखेवर चर्चा होणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून गप्प होते. विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी उरणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थी होत आहे. त्यामुळे आता मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासाठी बैठक होणार आहे.
एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांच्या नियोजनातील समन्वय
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ‘वर्णनात्मक पद्धत’ लागू करण्यामागील एक मुख्य उद्देश मराठी विद्यार्थ्यांचा यूपीएससी मधील टक्का वाढवणे हा होता. मात्र, दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात ताळमेळ नसल्यास हा उद्देश साध्य होण्यात अडचणी येऊ शकतात. जर एमपीएससी मुख्य परीक्षा आणि यूपीएससी पूर्व परीक्षा यांच्या तारखा जवळ असतील, तर विद्यार्थ्यांची ओढाताण होते. अभ्यासाचा समतोल: मुख्य परीक्षेच्या सखोल लेखी सरावात गुंतलेला विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या ‘ऑब्जेक्टिव्ह’ तयारीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही.
आयोगाने भविष्यात वेळापत्रक तयार करताना यूपीएससी पूर्व परीक्षेनंतर एमपीएससी मुख्य परीक्षा आयोजित केल्यास त्याचे अनेक फायदे होतील. विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेवर पाणी न सोडता दोन्ही परीक्षांची तयारी पूर्ण क्षमतेने करता येईल. दोन्ही परीक्षांचा पॅटर्न सारखा असल्याने, पूर्व परीक्षेनंतर मिळणाऱ्या काळात विद्यार्थी लेखी सरावावर लक्ष केंद्रित करून यूपीएससी मध्येही यश मिळवू शकतील.
