नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल तब्बल ९० दिवसांनी २७ फेब्रुवारीला जाहीर झाला. तर मुख्य परीक्षा २९ मार्चला होणार होती. त्यामुळे निकालानंतर मुख्य परीक्षेसाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी मिळणार होता.
निकालानंतर मुख्य परीक्षेसाठी किमान ४५ दिवसांचा अवधी मिळावा, असा नियम आहे. असे असतानाही आयोगातील प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका उमदेवारांना सहन करावा लागत होता. लोकसत्ताने या विषयाला वाचा फोडल्यावर अखेर आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. आता मुख्य परीक्षा २९ मार्च ऐवजी ५ एप्रिलपासून होणार आहे. पहिला पेपर ५ एप्रिलला असून ०२ मे पर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे.
‘एमपीएससी’कडून राज्यसेवा परीक्षा नियमांमध्ये बदल करण्यात आला. यानुसार पहिल्यांदाच राज्यसेवा २०२५ ही वर्णनात्मक पद्धतीने होत आहे. परीक्षा नियमानुसार, निकालानंतर किमान ४५ दिवसांचा अवधी मिळणे आवश्यक असते. यामुळे उमदेवारांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक तो वेळ मिळतो. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे निकालाला उशीर झाला. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.
आता मुख्य परीक्षा विलंबाने घ्यावी, अशीही मागणी होत आहे. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून होते. विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित होती.
निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ३० दिवसांचा कालावधी उरणार होता. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थ्यांकडून होत होता. अखेर आयोगाने याची दखल घेत परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे.
आयोगाचे म्हणणे काय?
आयोगामार्फत दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा- २०२५ आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक २९ मार्च, २०२६ ते २६ एप्रिल, २०२६ या कालावधीत घेण्यात येणार होती. तथापि, काही उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सदर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती केली होती. उमेदवारांची विनंती विचारात घेऊन उमेदवारांना परीक्षेकरीता कोणताही व्यत्यय येऊ नये व परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, याकरीता राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ खालीलप्रमाणे सुधारित दिनांकास घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. विषयांकित परीक्षेसाठी दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी प्रसिद्ध अधिसूचनेतील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता सुधारित दिनांक
०५ एप्रिल, २०२६, रविवार – भाषा, पेपर-१ – दुपार भाषा, पेपर- २
१८ एप्रिल, २०२६ शनिवार- निबंध पेपर ३
१९ एप्रिल, २०२६ रविवार- सामान्य अध्ययन -१ पेपर- ४ व सामान्य अध्ययन २ पेपर ५
२६ एप्रिल, २०२६ रविवार- सामान्य अध्ययन -३ पेपर ६ आणि सामान्य अध्ययन-४ पेपर ७
०२ मे, २०२६, शनिवार- वैकल्पिक विषय पेपर ८ – वैकल्पिक विषय पेपर ९
