नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये गोंधळ होत असल्याने अनेक प्रकरणे न्यायालयात जातात. विद्यार्थ्यांकडून परीक्षेवर अनेकदा प्रश्नचिन्हे उपस्थित केली जातात. न्यायालयामध्ये काहींना न्याय मिळतो तर काहींना अपयश येते. मात्र, एमपीएससीच्या गट अ दर्जाच्या पदाच्या एका परीक्षेत न्यायालयाने विद्यार्थी हिताचा निर्णय दिला असून यामुळे नव्याने शिफारस यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून बळ आले आहे. या निकालात महेश शेजल पहिला आला आहे. खुल्या वर्गातून त्यांनी पहिला येण्याचा मान मिळवला.
MPSC च्या संकेतस्थळावर सुधारित निकाल प्रसिद्ध
सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग संवर्गाची मुलाखत १८ ते २० ऑक्टोबर, २०२३ तसेच २ व ३ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. सदर संवर्गाशी निगडीत काही न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम आदेशाच्या अधीन राहून दिनांक २७ डिसेंबर, २०२३ रोजी अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई, खंडपीठ नागपूर येथे मुळ अर्ज क्रमांक १२५८/२०२३ या न्यायालयीन प्रकरणी १७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या अंतिम आदेशानूसार सुधारीत निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
दोन प्रकरणांच्या निकालांवर आधारित निर्णय
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्र. १५००/२०२३ या प्रकरणी अंतरिम आदेशानुसार अराखीव (महिला) वर्गवारीच्या आरक्षीत एका पदाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तसेच सदर निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, नागपूर येथे दाखल मूळ अर्ज क्र.१०४७/२०२३ प्रकरणी व मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल केलेली रिट याचिका ७४१९/२०२३ या दोन अन्य न्यायीक प्रकरणांच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
न्यायालयाने दिलास दिल्याने बळ
एमपीएससीच्या अनेक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर विश्वास नसतो. किंवा अनेकदा परीक्षांमध्ये गोंधळ होतो. यामुळे परीक्षेच्या निकालावर विद्यार्थी अनेकदा न्यायालयात जातात. अनेकदा न्यायालयीन प्रकरणामुळे निकाल जाहीर होण्यासही विलंब होतो. यामुळे विद्यार्थी अस्वस्थ होतात. न्यायालयीन प्रकरणामुळे अनेक वर्ष उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थी पारदर्शी प्रक्रियेची मागणी करतात. परंतु, अनेकदा न्यायालयामध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. अशाच या प्रकरणात न्याय मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
