नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्वात महत्त्वाच्या अशा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ परीक्षेचा निकाल तीन महिन्यांपासून रखडला आहे. या परीक्षेची दुसरी व अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाला. मात्र, त्यानंतरही निकाल जाहीर न झाल्याने मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष वाढत आहे. राज्यातील १ लाख ७५ हजार ५१६ उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. लाखो उमेदवार या परीक्षेच्या निकालाची वाट बघत आहेत. तर पूर्व परीक्षेचा निकाल लांबल्याने आता मुख्य परीक्षेच्या तारखेबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी काहींची मागणी आहे. याबाबत थेट एमपीएससीच्या सचिवांनी लोकसत्ताशी बोलताना माहिती दिली आहे.
आयोगाने यंदा २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. २०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर विविध संवर्गातील एकूण ३८५ पदांसाठी जाहिरात आली. सुधारित मागणीपत्रानुसार, जानेवारी २०२६ मध्ये या पदांमध्ये वाढ करून ६०५ पदांसाठी ९ नाव्हेंबर २०२५ ला नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर दीड महिने उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोगाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही.
विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी उरणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याची उमेदवारांची ओरड आहे. त्यामुळे आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा अशी मागणी होत आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार निकालाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच निकालही जाहीर होणार आहे.
आश्वासनानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
‘एमपीएससी’च्या कार्यप्रणालीमध्ये सुधार करत तत्परत आण्यासाठी राज्य सरकारकडून अनेकदा घोषणा करण्यात आली. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात एमपीएससीमध्ये आवश्यक पदभरती करून परीक्षा आणि निकालाला गती देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. परीक्षेची जाहिरात आल्यापासून अंतिम निकाल लागेपर्यंत तीन ते चार वर्षांचा कालावधी जात आहे. राज्यसेवेसारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा निकालही तीन महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे आयोगाच्या एकंदरित दिरंगाईच्या कारभारावर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
निकाल तयार करणे ही मोठी प्रक्रिया असते. राज्यसेवा परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया जलदगतीने सुरू असून लवकरच तो जाहीर केला जाईल. – महेंद्र हरपाळकर, सचिव एमपीएससी.

