नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पकडलेल्या परीक्षा निकाल ही मुलाखती हे आता नेहमीचेच बाब झालेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयोगाकडून विविध प्रयत्न केले जातात. यासोबतच सरळसेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घ्या अशी अनेक वर्षांपासूनची विद्यार्थी संघटनांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली होती. त्यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळाने केरळ लोकसेवा आयोगाला(केलोआ) भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात सकारात्मक चर्चा झाली असून भविष्यात ‘केलोआ’च्या धर्तीवर ‘एमपीएससी’मार्फत राज्यातील सर्व परीक्षा होणार अशी चर्चा पुढे आली. त्यानंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी एमपीएससी मुंबई कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत काय दडले ते पाहूया.
सरकारच्या विविध खात्यांतील वर्ग दोन व तीनची पदे पूर्वी ‘महापरीक्षा पोर्टल’मार्फत भरली जात होती. परंतु, तोतया उमेदवार, गुणांमध्ये फेरफार अशा प्रकारांमुळे पोर्टल बंद करून ‘महाआयटी’तर्फे कंपन्यांना काम देण्यात येऊ लागले. त्यालाही विरोध झाला व ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी झाली. त्यामुळे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. लिपिक-टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे ‘एमपीएससी’च्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही शासनाने ७५ हजार पदांच्या भरतीसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांना कंत्राट दिले. अनेक विभागांच्या परीक्षा या दोन कंपन्यांकडून सुरू असून यात गैरप्रकाराचे आरोप झाले. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घेण्याचा निर्णय घेतला.
केरळच्या बैठकीत काय झाले होते ?
सरळसेवा भरती एमपीएससीमार्फत घेण्यासंदर्भात जुलै २०२४ मध्ये शासन निर्णयही काढण्यात आला. या भरतीमधून केवळ वाहन चालक पद वगळण्यात आले. शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पदभरतीची कार्यवाही ही टीसीएस आणि आयबीपीएस या कंपनीकडून सुरू राहील. त्यानंतर ‘एमपीएससी’च्या कक्षेत सर्व पदे आणून १ जानेवारी २०२६ नंतर गट-ब (अराजपत्रित) व गट- क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’कडून होणार आहे. यानुसार, एमपीएससीने कार्यवाही सुरू केली आहे. केरळ राज्यातील सर्व परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. त्यामुळे ‘एमपीएससी’चे सदस्य आणि काही अधिकाऱ्यांनी नुकतीच केरळ आयोगाची भेट घेऊन तेथील परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला. यावेळी सकारात्मक बैठकही घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत होण्याची शक्यता आहे.
भेटीसंदर्भात आयोग काय म्हणतो?
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष संजय श्रीनेत यांनी २ फेब्रुवारी रोजी एमपीएससीच्या कार्यालयास भेट दिली. सदर भेटीदरम्यान एमपीएससीच्या सर्वोत्तम कार्यपध्दती व तंत्रज्ञान उपक्रम इत्यादींबद्दल माहिती घेतली. यावेळी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ व सदस्य राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन, दिलिप पाटील-भुजबळ व सचिव महेंद्र हरपाळकर व सहसचिव सुनिल अवताडे उपस्थित होते. यासंदर्भात आयोगातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी परीक्षा ही गोपनिय बाब असल्याने तुर्तास या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

