नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यसेवा २०२४ परीक्षेचा अंतिम निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये मोठी निराशा आणि असंतोष पसरला आहे.
विद्यार्थ्यांच्या पदरी कायमच निराशा
डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या परीक्षेची जाहिरात आता दोन वर्षे पूर्ण झाली, तरी अंतिम निवड यादीची प्रतीक्षा संपलेली नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी तहसीलदार अशा विविध पदांवर नियुक्ती होईल, या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यासाठी पुढे पुणे, नागपूर, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये परीक्षेची तयारी करतात. यासाठी प्रचंड आर्थिक भारही सहन करतात. मात्र एमपीएससीच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या पदरी कायमच निराशा पडलेली आहे. दोन ते तीन वर्ष एखाद्या परीक्षेचा निकाल लागल्यामुळे उमेदवारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात.
भरतीतील मुख्य टप्पे
सदर भरतीतील मुख्य टप्पे पुढीलप्रमाणे पार पडलेले आहेत
जाहिरात प्रसिद्ध दिनांक : २९ डिसेंबर २०२३
पूर्व परीक्षा दिनांक : १ डिसेंबर २०२४
पूर्व परीक्षा निकाल : १२ मार्च २०२५
मुख्य परीक्षा जाहिरात क्रमांक : ०१३/२०२५
मुख्य परीक्षा जाहिरात प्रसिद्ध दिनांक : २० मार्च २०२५
मुख्य परीक्षा दिनांक : २७ ते २९ मे २०२५
मुख्य परीक्षा निकाल : ९ सप्टेंबर २०२५
मुलाखत दिनांक : १७ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२५
सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध दिनांक : ३० ऑक्टोबर २०२५
तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध दिनांक : ५ जानेवारी २०२६
ऑप्टिंग आऊट व अपिलीय मेडिकल प्रक्रिया पूर्ण, तरीही…
तथापि, ऑप्टिंग आऊट व अपिलीय मेडिकल प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे, तरी अद्यापही अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया आता जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक विलंबित झालेली असून याचा उमेदवारांवर दीर्घकालीन मानसिक व आर्थिक परिणाम होत आहे. मोठ्या संख्येने उमेदवार अल्पभूधारक, अत्यल्प उत्पन्न अथवा सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून येत असल्याने हा विलंब त्यांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम करीत आहे. याशिवाय, शासकीय प्रशिक्षण तसेच पुढील नियुक्त्या प्रलंबित राहिल्याने शासनातील रिक्त पदांची समस्या अधिक गंभीर होत आहे.
मागण्या काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अंतिम गुणवत्ता यादी व निकाल तत्काळ प्रसिद्ध करून निवड उमेदवारांची शिफारस सामान्य प्रशासन विभागास लवकरात लवकर करावी. तसेच सदर भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण व नियुक्ती या प्रक्रियेस विलंब न लावता तातडीने प्रारंभ करण्याबाबत मार्गदर्शन/सूचना जारी करण्यात याव्यात. उच्चस्तरिय न्याय व तातडीची शासकीय गरज लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा मागण्या उमेदवारांकडून केल्या जात आहेत.
आता आयोगाच्या गतिमानतेवर सर्वांचे लक्ष
राज्यसेवा २०२४ परीक्षेचा अंतिम निकाल वेळेत जाहीर करून उमेदवारांना योग्य न्याय मिळावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. मेडिकल अपिलीय प्रोसेस ला विनाकारण जास्त वेळ जात असल्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया थांबलेली आहे. आयोगाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून, उमेदवारांना होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्त करावे, अशी उमेदवारांची ठाम मागणी आहे.
