अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC ) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या महाराष्ट्राच्या निवडणूक राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकते, असा दावा ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके यांनी शनिवारी सायंकाळी अमरावतीतील गाडगे नगर येथे परीक्षार्थींशी संवाद साधताना केला.

एक कोटी लोकांचा प्रभाव

संपूर्ण राज्यात १५ ते २० लाख विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करत असल्याचा दावा दिपके यांनी केला. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करता, या मुद्द्याशी संबंधित लोकांची संख्या सुमारे एक कोटी असू शकते, असे अभिजीत दीपके म्हणाले.

निवडणुकीच्या दबावात प्रतिसाद

सुशिक्षित तरुणांच्या समस्या समजून घेणारे पुरेसे सुशिक्षित प्रतिनिधी राजकीय व्यवस्थेत नाहीत, असे अभिजीत दीपके म्हणाले. निवडून आलेले प्रतिनिधी निवडणुकीच्या दबावातच प्रतिसाद देत असल्याने, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एकत्रित आवाज सरकारला त्यांच्या मागण्यांवर कृती करण्यास भाग पाडू शकतो, असे दिपके यांनी नमूद केले.

अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, कथित पेपरफुटीच्या प्रकरणासाठी दीपके यांनी आयोगाला जबाबदार धरले. स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण गांभीर्याने आणि पारदर्शकपणे केले जावे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी अध्यक्ष राजीनामा द्या, राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी देखील केली.

पत्रकारांच्या विरोधात घोषणाबाजी

वर्ध्याहून सायंकाळी ५ वाजता येणे अपेक्षित असलेले दिपके ६ वाजण्याच्या सुमारास सभास्थळी पोहोचले. तेथे पोहोचताच गोंधळ उडाला; तिथे तरुणांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी कोणताही मंच किंवा आसनव्यवस्था नव्हती आणि ते गवतावर बसले होते. पत्रकार सभास्थळी पोहोचताच, परीक्षार्थींच्या एका गटाने ‘मीडिया गो बॅक’ (मीडिया परत जा) अशा घोषणा दिल्या आणि पत्रकारांना निघून जाण्यास सांगितले. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने तैनात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली आणि पत्रकारांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एल्गार

काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पेपरफुटीच्या प्रकरणात एमपीएससी अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. अभिजीत दीपके यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी हीच मागणी रेटून धरली आणि प्रचंड घोषणाबाजी केली. संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदानात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.