नागपूर : गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचे यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी असते. संपूर्ण पंचक्रोशीतील स्वप्न बघणाऱ्या सर्व पिढीसाठी आज चंदन बंधू हे खूप मोठे उदाहरण आहेत. ही यशोगाथा आहे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चंदन कुटूंबीय यांची. ज्यातील एक भाऊ दिलीप मालन चंदन नागपूर गुन्हे शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर दुसरा विजय मालन चंदन पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे आणि छायाचित्रातील मध्यभागी असलेला अजय मालन चंदन. नुकतीच त्याची राज्य कर निरीक्षक पदावर पदावर एमपीएससीमार्फत निवड झाली.

नुकताच एमपीएससी उत्तीर्ण झाला तो अजय मालन चंदन. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगरच्या उखलगाव या गावातील हे तिघे भाऊ. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ शाळा उखलगाव येथून घेतले. पुढे समाजशास्त्र या विषयात आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथून पदवीचे शिक्षण घेतले. दोन मोठ्या भावांचा आदर्श घेत अजय यानेही एमपीएससी परीक्षेचा ध्यास धरला आणि त्यात यश मिळवले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब २०२४ मध्ये राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदी निवड झाली. त्याने
केडगाव, अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अजयचे मोठे बंधू दिलीप मालन चंदन यांची एमपीएससीच्या चमाध्यमातून २०१० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असून सध्या ते गुन्हे शाखा नागपूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. ते सुरुवातीला शिक्षक होते.

दुसरे बंधु विजय मालन चंदन यांची २०१२ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. ते सध्या पुणे शहर येथे सहा. पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तेही सुरुवातीला शिक्षक होते. मात्र एमपीएससी परीक्षेच्या दोन्ही भावांना स्वस्त बसू देत नसल्याने दोघांनीही त्याची तयारी केली आणि मोठ्या पदावर जाण्याचा निर्णय घेत अखेर एमपीएससी गाठले. विशेष म्हणजे आईने तिघाही भावांचे शिक्षण पूर्ण केले.

अजय आपल्या प्रवासाबद्दल सांगतो की, सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानुसार पदवीपासून माझा अभ्यास सुरू होता. माझ्या यशानंतर तिसरा भाऊ देखील एमपीएससीचतून अधिकारी झाला आहे. तीन सख्खे भाऊ एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी होणे हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. या यशामागे माझी आई, भाऊ माझे कुटुंब आणि मित्र यांचा खूप मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सातत्य, जिद्द व चिकाटी खूप महत्वाची आहे. तसेच वेळेचा सदुपयोग व योग्य नियोजन करूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते.