नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी तीन महिन्यांआधी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा संदर्भात महत्त्वाची गोष्ट आयोगाने जाहीर केली आहे. समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षाची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक ३ सप्टेंबर रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
असा आहे या परीक्षेचा इतिहास
‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु, समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. लोकसत्ताने याविषयाला वाचा फोडल्यावर आयोगाने याची दखल घेत मंगळवारी शुद्धीपत्र जाहीर केले. त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली.
हे ही वाचा… अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली
राज्यसेवा तूर्तास नाही?
यानंतर आयोग परीक्षेची तारीख जाहीर करणार एमपीएससीची राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचल्या असून त्यांना कधीही परीक्षा घेणे शक्य आहे. मात्र, असे असले तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा फटका परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी निवडणुकांच्या तारखांचा अंदाज घेऊनच आयोग परीक्षेची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.