गडचिरोली: झारखंड, छत्तीसगड आणि बिहार सीमा भागातील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या ‘बुढापहाड’चा शेवटचा क्रूर नक्षल नेता अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात अडकला आहे. गेली दोन दशके हुलकावणी देणारा आणि सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकणारा जहाल नक्षलवादी कमांडर मृत्युंजय भुईया ऊर्फ फारेश (४०, रा. नवदीह छिप्पाडोहर, जि. लातेहार, झारखंड) याला १२ मार्च रोजी अटक करण्यात यश आले आहे. त्याच्या अटकेने केवळ झारखंडच नव्हे, तर छत्तीसगड आणि बिहारच्या सीमावर्ती भागातील दहशतीचा एक हिंसक अद्याय कायमचा बंद झाला आहे.

शंभराहून अधिक गंभीर गुन्हे

मृत्युंजय भुईया नावाची त्या परिसरात प्रचंड दहशत होती. २०१३ मध्ये गढवा जिल्ह्यात त्याने १३ जवानांना रात्रीच्या सुमारास जिवंत जाळले होते. ही त्याची क्रूरता पाहून नक्षलवादी संघटनेत त्याचे वजन वाढले आणि तो ‘झोनल कमांडर’ बनला. तो केवळ बंदूक चालवण्यात तरबेज नव्हता, तर स्फोटक तज्ज्ञ म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या हाताने पेरलेल्या सुरुंगांनी आजवर ५० हून अधिक जवानांचा बळी घेतला आहे. त्याच्यावर विविध राज्यात मिळून ५० लाखांहून अधिकचे बक्षीस होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी (एनआयए) तो अत्यंत महत्त्वाचा आरोपी होता. खंडणी, हत्या आणि जवानांवरील हल्ल्यांसह शंभराहून अधिक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत.

तीन राज्यांच्या सीमेवर दहशतीचे त्रिकोणी साम्राज्य

झारखंड, बिहार आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर त्याने दहशतीचे एक त्रिकोणी साम्राज्य उभारले होते. मात्र, २०२२ मध्ये सीआरपीएफ, कोब्रा बटालियन व झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या ‘ऑपरेशन ऑक्टोपस’नंतर या परिसराचे चित्र पालटले. यात त्याचे अनेक साथीदार मारले गेले किंवा शरण आले, मात्र मृत्युंजय तेव्हाही पसार होण्यात यशस्वी झाला होता. त्याच्यावर वचक बसवण्यासाठी प्रशासनाने त्याच्या १४.२६ एकर जमिनीवर टाच आणत आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. तरीही घनदाट जंगलाची खडानखडा माहिती असल्याने तो सातत्याने चकवा देत होता. मात्र, अखेर हा ‘मृत्युंजय’ तांदळाच्या गोणीच्या मोहात सापडला. तो धान्य घेण्यासाठी जंगलाबाहेर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हा क्रूरकर्मा आपल्या एका साथीदारासह अडकला आणि त्याचा दोन दशकांचा हिंसाचाराचा प्रवास अखेर थांबला.

निर्णायक आणि मोठी कामगिरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच २०२६ च्या ३१ मार्चपर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्या दृष्टीने, बुढापहाडसारख्या दुर्गम भागात वर्चस्व गाजवणारा आणि सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरलेला मृत्युंजय भुईयाची अटक ही केंद्र सरकारच्या ‘नक्षलमुक्त भारत’ मोहिमेतील एक अत्यंत निर्णायक आणि मोठी कामगिरी मानली जात आहे.