Mahavitran Electricity Discount: नागपूर : राज्यातील वीज ग्राहकांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) सवलतीचा मोठा परिणाम दिसून येत असून, जुलै २०२५ पासून आतापर्यंत तब्बल ७० लाख ग्राहकांना एकूण २,२३५ कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाला. विशेषतः उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा सर्वाधिक लाभ झाला असल्याची माहिती महावितरणने दिली.

‘टीओडी’ सवलत म्हणजे काय?

वीज वापराच्या वेळेनुसार दरात सवलत देण्याच्या धोरणाला ‘टीओडी’ सवलत म्हटले जाते. राज्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. जुलै २०२५ पासून १० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना या सवलतीचा लाभ दिला जात आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १५ टक्के, तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत २५ टक्के सवलत देण्यात येत आहे.

सर्वाधिक लाभ औद्योगिक ग्राहकांना

या योजनेत उच्चदाब औद्योगिक ग्राहक आघाडीवर असून १५,९०७ ग्राहकांना एकूण १,५३४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. औद्योगिक क्षेत्राचा एकत्रित विचार केला असता ४३,९११ ग्राहकांना तब्बल १,७७४ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. तसेच उच्चदाब व लघुदाब वाणिज्यिक गटातील ११,०१७ ग्राहकांना २३९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. घरगुती ग्राहकांसाठीही प्रथमच टीओडी सवलत लागू करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळत आहे. आतापर्यंत ६९ लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना १,०९६ दशलक्ष युनिट विजेवर ८९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर सेवांसाठीही या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अशा १२,९८९ ग्राहकांना मिळून २०२ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

सौरऊर्जेची उपलब्धता वाढत असल्याने दिवसा वीज स्वस्त

राज्यात सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढत असल्याने दिवसाच्या वेळेत वीज स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार ही सवलत लागू करण्यात आली आहे. महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की, अधिक वीज वापर करणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वापरल्यास वीजबिलात लक्षणीय बचत होऊ शकते. तसेच राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग मिळत असून, भविष्यात टीओडी सवलतीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.