अमरावती : महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी विजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अमरावती परिमंडळात दर महिन्‍याला सुमारे दीडशे धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो. धनादेश अनादरीत प्रकरणात या ग्राहकांना दंड सोसावा लागतो.

‘ऑनलाईन’ वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध असली तरी अद्यापही परिमंडळातील काही वीज ग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. यामध्ये मात्र दरमहा सुमारे दीडशे ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश न वटता परत येत असल्याचे दिसून येत आहे.

थकीत वीज बिलाची कारवाई टाळण्यासाठी न वटणारे धनादेश देत महावितरणची दिशाभूल करत वेळ मारून नेणाऱ्या वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना आता अमरावती परिमंडळात वेग देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिली आहे.

महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी विजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अमरावती परिमंडळात दरमहा सुमारे सरासरी १५० धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. परंतू महावितरणच्या असे लक्षात आले की, काही वीज ग्राहकांनी दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरीत होत असल्याचे आढळून येत आहे.

परिणामी वीज बिलाची वसूली न होता थकबाकीत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणने मोहिम घेत धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचालींना गती दिली आहे.

यासोबतच चेक बाऊन्स झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येते. तसेच अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी स्वतंत्र दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येते.

२७ लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स

फेब्रुवारी महिन्याच्या २२ दिवसात परिमंडळात २७ लाख रुपयांचे १२० धनादेश बाऊंस झाले असून यात अमरावती जिल्ह्यातील ८५ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३५ धनादेशाचा समावेश आहे. त्यामुळे आता महावितरण कंपनीने निर्वाणीचा इशारा दिला आहे.