यवतमाळ : राज्याच्या सार्वजनिक दळणवळण क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) उद्या १ जून रोजी आपल्या प्रवासाची ७८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहे. बरोबर ७८ वर्षांपूर्वी, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच, १ जून १९४८ रोजी राज्याच्या वाहतूक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा प्रसंग घडला. अहमदनगरमधील माळीवाडा परिसरातून पुणे शहरासाठी पहिली प्रवासी बस मार्गस्थ झाली आणि महाराष्ट्रात अधिकृत सरकारी प्रवासी वाहतुकीचा पाया रचला गेला. पुढे याच लालपरीने महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून लौकिक मिळवला.

पहिला पगार ८० रुपये!

त्या काळी आजच्यासारखी आधुनिक बसस्थानके किंवा सिमेंटचे रस्ते नव्हते. खाजगी वाहतूकदारांच्या मक्तेदारीत सरकारने जनतेच्या सुलभ प्रवासासाठी ‘स्टेट ट्रान्सपोर्ट’ (एसटी) सुरू केली. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, या ऐतिहासिक पहिल्या बसचे चालक किसन राऊत आणि वाहक लक्ष्मण केवटे हे दोघेही नगरचेच सुपुत्र होते. सुरुवातीच्या काळात वाहक म्हणून रुजू झालेल्या लक्ष्मण केवटे यांना अवघा ८० रुपये महिना पगार मिळायचा, जो पुढे दीडशे रुपयांपर्यंत वाढला.

‘तिला’ बघायला कुतूहल, जल्लोष

त्या काळात नगर ते पुणे दरम्यानचे साधारण सव्वाशे किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना फक्त अडीच रुपये तिकीट मोजावे लागत असे. पहिली बस कशी दिसते, हे पाहण्यासाठी नगर आणि पुण्यातील नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल होते. आजच्या आधुनिक लोखंडी किंवा फायबरच्या गाड्यांच्या तुलनेत ती पहिली बस संपूर्णपणे लाकडी बनावटीची होती आणि तिची आसनक्षमता केवळ ३० प्रवाशांची होती. १ जून १९४८ रोजी सकाळी ठीक ८ वाजता जेव्हा ही लाकडी बस माळीवाड्यातून निघाली, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी तर या बसचे मनोभावे पूजन केले आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. हा प्रवास केवळ दोन शहरांपुरता मर्यादित नव्हता, तर मार्गावरील चास, सुपे, शिरूर, शिक्रापूर आणि लोणीकंद या गावांमध्येही या ‘सरकारी गाडी’चे स्वागत करण्यासाठी उत्सवाचे वातावरण होते. बस गावात येताच ग्रामस्थांनी तिचे जंगी स्वागत केले.

काळ बदलला, रूप बदलले!

गेल्या पाऊण शतकात बदलत्या काळाची पावले ओळखून एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात आणि सेवेत आमूलाग्र बदल केले. सुरुवातीची लाकडी बस काळानुरूप बदलत गेली आणि तिची जागा ‘लालपरी’ने घेतली. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बनलेली ही साधी लाल बस पुढे निमआराम (आशियाड), मिडी बस, आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘शिवनेरी’ (व्हॉल्वो) व ‘शिवशाही’ यामध्ये रुपांतरित झाली. आता तर पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात ‘शिवाई’ आणि ‘राजमाता जिजाऊ’ सारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक (ई-बस) गाड्या दिमाखात धावत आहेत.

महामंडळाचा विस्तार आणि सवलतींचा भार

आज महामंडळाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात झाला असून ‘जिथे रस्ता, तिथे एसटी’ हे ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थ ठरले आहे. सध्या महामंडळात सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळे दररोज १७ हजार बस गाड्यांच्या माध्यमातून तब्बल ७० लाखांपेक्षा जास्त प्रवासी सुरक्षित प्रवास करत आहेत. महिलांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत देणारी ‘महिला सन्मान योजना’ आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत व सवलतीचा प्रवास यांसारख्या विविध लोकोपयोगी योजना महामंडळाकडून प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’

७८ वर्षांचा हा सुवर्ण प्रवास आज मात्र अत्यंत खडतर व आव्हानात्मक वळणावर येऊन पोहोचला आहे. एकेकाळी सरकारी नोकऱ्या सोडून लोक सन्मानाने एसटी महामंडळात नोकरीला प्राधान्य देत असत; कारण ९० च्या दशकात महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत होती आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर उत्तम पगार मिळत होते. परंतु, आज परिस्थिती बदलली आहे. डिझेल आणि सुट्या भागांच्या वाढत्या किमती, खाजगी प्रवासी वाहतुकीचे मोठे आव्हान आणि वाढता प्रशासकीय खर्च यामुळे महामंडळ प्रचंड आर्थिक तोट्यात चालले आहे. अनेक मार्गांवर प्रवासी संख्या रोडावली आहे. तरीही, केवळ नफा-तोटा न पाहता, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वाला जागत एसटी आजही ग्रामीण भागातील शाळकरी मुले, शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी तोटा सहन करूनही धावत आहे. ७८ वर्षांपूर्वी दिमाखात सुरू झालेली ही हक्काची ‘लालपरी’ने आजही अनेक अडचणींचा सामना करत महाराष्ट्राच्या प्रगतीचे चक्र गतिमान ठेवले आहे.