नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेतत्त्वावरील ई-बस प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत आहे. हा तोटा दरवर्षी वाढत असून नागपूर विभागात प्रति किलोमीटर सुमारे २५ रुपयांचे नुकसान होत आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात १४.५० कोटींचा तोटा नोंदविण्यात आला. राज्यातील इतर विभागांतही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेससह इतर कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १६ एप्रिल रोजी मुंबई येथे घेतलेल्या आढावा बैठकीत एसटीच्या नागपूरसह इतर विभागांतील वाढत्या तोट्याबाबत चिंता व्यक्त केली होती. या तोट्यात ई-बसचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या एसटीकडे राज्यभरात भाडेतत्त्वावरील ७३८ ई-बस असून त्यापैकी ६३ बस नागपूर विभागात आहेत. नागपूर विभागातील एकूण वाहतुकीपैकी सुमारे १४ टक्के वाटा ई-बसचा आहे. भाडेतत्त्वावरील या प्रकल्पामुळे नागपूर विभागात प्रति किलोमीटर सुमारे २५ रुपयांचा तोटा होत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात नागपूर विभागाला एकूण ५० कोटी १३ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. नागपूर विभागातील तोट्यापैकी १४.१५ कोटी रुपयांचा तोटा ई-बसमुळे झाल्याची नोंद आहे. हा तोटा कायम राहिल्यास महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच डळमळीत होण्याची भीती कामगार संघटोने व्यक्त केली आहे. राज्यात हा तोटा ३ हजार कोटींच्या जवळपास असल्याचा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा आहे.
प्रति किलोमीटर भाडे किती?
एसटी महामंडळाने केलेल्या करारानुसार नागपूर विभागात ९ मीटर ई-बससाठी ६३ रुपये प्रति किलोमीटर, तर १२ मीटर ई-बससाठी ७२ रुपये प्रति किलोमीटर दराने कंत्राटदारांना भाडे दिले जाते. या बसमध्ये चालक खासगी संस्थेचा, तर वाहक एसटीचा असतो. प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर खर्च आणि कंत्राटदाराला दिले जाणारे भाडे वजा केल्यानंतर प्रति किलोमीटर सुमारे २५ रुपयांचा तोटा होत आहे. काही विभागांत हा तोटा २८ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.
परिवहन मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नागपूरसह पूर्व विदर्भातील इतर विभागांत ई-बसमध्ये प्रवासी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या हंगामाचा काळ असल्याने तोटा कमी होण्यास मदत होईल.
– श्रीकांत गभने, प्रादेशिक व्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र. ३, नागपूर प्रदेश
नागपूरसह इतर विभागांतील एसटीच्या वाढत्या तोट्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जात असले, तरी प्रत्यक्षात ई-बसमुळेच तोटा वाढला आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची गरज आहे.
– श्रीरंग बरगे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
एसटी महामंडळाने अवास्तव दराने ई-बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहे. या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. महामंडळाने ई-बस भाडेतत्त्वाऐवजी खरेदी करून चालवाव्यात.
– अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना
