अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतधारक प्रवाशांना वितरीत करण्यात येत असलेले ‘एनसीएमसी कार्ड’ १ सप्टेंबरपासून अनिवार्य केले. मात्र, याने सवलतधारकांसह वाहकांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. तिकीट यंत्रात ‘एरर’ आल्याने संपूर्ण यंत्रणा कोलमडली. त्यामुळे पूर्ण तिकीटाचा भुर्दंड बसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ‘एनसीएमसी कार्ड’ सक्तीच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
‘एनसीएमसी कार्ड’ वितरण खासगी कंपनीकडे
रा.प. महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना सवलतधारी तसेच विनासवलतधारी प्रवाशांना ‘एनसीएमसी कार्ड’ वितरणाची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे कार्ड नोंदणीकरण व वितरणासाठी ‘मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि.’ यांचेद्वारे एसटी महामंडळाचे आगार, बसस्थानके तसेच आगार हद्दीबाहेर एजंटची नियुक्ती केली. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे ‘एनसीएमसी कार्ड’ नोंदणीकरण व वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारी प्रवाशांना ‘एनसीएमसी कार्ड’ नोंदणीकरण व वितरण केले जाणार असल्याचे महामंडळ प्रशासनाने स्पष्ट केले.
‘एनसीएमसी कार्ड’ ज्येष्ठ नागरिक व महिलांना अनिवार्य
‘एनसीएमसी कार्ड’ ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना १ सप्टेंबरपासून अनिवार्य केले. ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट ‘एनसीएमसी कार्ड’मधूनच वितरीत करण्यासह वाहकांना त्याचे ‘टॉप अप’ देखील करावे लागत आहे. या संदर्भात कार्यप्रणाली निश्चित करून देण्यात आली. आगारातील सर्व चालक तथा वाहकांना सूचना दिल्या आहेत.
‘एनसीएमसी कार्ड’ अंमलबजावणीत ‘एरर’
‘एनसीएमसी कार्ड’ अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाला. तिकीट यंत्रात ‘एरर’ आल्याच्या असंख्य तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे ‘एनसीएमसी कार्ड’ मधून सवलतीचे वितरीत करण्यासह वाहकांनी त्यामध्ये ‘टॉप अप’ करण्याची प्रक्रिया संपूर्णत: विस्कळीत झाली. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी वाहक व प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. ‘एनसीएमसी कार्ड’मुळे तिकीट यंत्रात ‘एरर’ आले.
सवलतधारकांना आर्थिक फटका
सवलतीच्या दरात तिकीट देण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे असंख्य सवलतधारक महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकीटाची पूर्ण रक्कम देऊन प्रवास करावा लागला. यंत्रणा सक्षम व प्रक्रिया पूर्ण झाली नसतांनाच ‘एनसीएमसी कार्ड’ सक्तीची एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
नेटवर्क, सॉफ्टवेअरची अडचण
महामंडळाने ‘एनसीएमसी कार्ड’ ची सक्ती केली तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये पहिल्याच दिवशी असंख्य अडचणींचा सामना प्रवाशांसह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना करावा लागला. अनेक भागात नेटवर्क नसल्याने ही यंत्रणा कूचकामी ठरली. शिवाय सॉफ्टवेअर देखील अद्ययावत नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
