बुलढाणा : मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा दरम्यान धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस रस्त्याच्या बाजूला घसरून खड्ड्यात कलंडली . यामुळे बस मधील किमान १२ प्रवासी जखमी झाले. जखमीवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. सुदैवाने चालकाने वेळीच बस नियंत्रित केल्याने संभाव्य भीषण दुर्घटना टळली.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरात आज गुरुवारी, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे खड्डे आणि मातीचा अंदाज न आल्याने बस (क्रमांक एम एच ४० एन ९४८६) खेडी आणि कोऱ्हाळा दरम्यान रस्त्याशेजारील मोठ्या चरीत (नालीत) उतरली. या अपघातात १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सदर बस कुऱ्हा गोतमारा येथून मलकापूरकडे जात होती. सध्या या मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने काम सुरू असल्याने वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती. मात्र, रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावाचा अंदाज चालक सुरडकर यांना न आल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याशेजारील खोल चरीत उतरली.
सकाळची फेरी आणि भर वाहतुकीची वेळ असल्याने अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. बस नाली वजा खड्डयात अडकल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. य घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्त्याच्या कामामुळे अपघातांचा धोका
मलकापूर-कुऱ्हा गोतमारा रस्त्याचे काम अनेक दिवसापासून रेंगाळले असून धिम्या गतीने सुरु आहे.त्यातच वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन न होता मातीचा उपसा व भराव केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भर रस्त्यात असलेल्या मातीमुळे वाहन चालवताना अडथळा निर्माण होत असून, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने खबरदारी घेण्याची मागणी गावकरी आणि प्रवाश्यातून होत आहे.

