नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवरून राज्यातील कामगार संघटना आक्रमक झाल्या असतानाच आंदोलनांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर झाल्याने कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आंदोलन, सेवाशक्ती संघर्ष संघटनेचा ६ नोव्हेंबरला संप, तर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचा (इंटक) ७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा आहे. अशा परिस्थितीत ३ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत संघटना एकत्र येणार की आंदोलनांचे स्वतंत्र मार्ग कायम राहणार, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनांच्या तीन वेगवेगळ्या तारखांमुळे संभ्रम का?
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बहुतांश समान असतानाही संघटनांनी स्वतंत्रपणे आंदोलनांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या एकजुटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकाच मागणीसाठी वेगवेगळ्या दिवशी आंदोलने झाल्यास सरकारवर अपेक्षित दबाव निर्माण होईल का, असा सवाल कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
दिवाळीचा बोनस किंवा सानुग्रह अनुदान, २०१६ पासूनच्या एक टक्का वेतनवाढीचा फरक, २०१८ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी, महागाई भत्ता ५८ वरून ६० टक्के करणे आणि प्रलंबित वेतन करार या प्रमुख मागण्या आहेत. अनेक आर्थिक लाभ अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
३ नोव्हेंबरची बैठक निर्णायक ठरणार का?
विविध संघटनांच्या प्रतिनिधींना ३ नोव्हेंबरला बैठकीसाठी बोलावल्याची माहिती कामगारांमध्ये प्रसारित होत आहे. या बैठकीत सर्व संघटनांनी स्वतंत्र भूमिका मांडण्याऐवजी एकत्रित मागणीपत्र सादर करावे आणि प्रत्येक मागणीच्या पूर्ततेसाठी निश्चित कालमर्यादा मागावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकजूट न झाल्यास काय होऊ शकते?
संघटनांचे स्वतंत्र आंदोलन सुरू राहिल्यास कामगारांच्या सामूहिक ताकदीचे चित्र सरकारसमोर प्रभावीपणे मांडले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संघटनांमधील मतभेद बाजूला ठेवून संयुक्त लढ्याची दिशा ठरवण्याची मागणी होत आहे.
कामगारांना आता नेमके काय हवे आहे?
आंदोलनांच्या घोषणा आणि आश्वासनांपेक्षा खात्यात जमा होणारा बोनस, थकीत आर्थिक लाभ आणि वेतनवाढीबाबत ठोस निर्णय कामगारांना अपेक्षित आहेत. त्यामुळे ३ नोव्हेंबरच्या बैठकीतून प्रत्यक्ष आर्थिक लाभांचा मार्ग मोकळा होणार की संपाच्या दिशेने संघर्ष पुढे जाणार, याची उत्सुकता आहे.
