वर्धा : नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाचे संलग्नीकरण असलेले मुख्य विद्यापीठ होय. याद्वारे वैद्यकीय ( Medical ), दंत वैद्यकीय ( Dental ), आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नर्सिंग, व अन्य पॅरा मेडिकल अभ्यासक्रमच्या परीक्षा घेतल्या जातात. तसेच पदव्युत्तर, फेलोशिप, सर्टिफिकेट व तत्सम परीक्षा हे विद्यापीठ घेत असते. आता या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या आहेत.

७ जुलैच्या परीक्षा स्थगित

मुसळधार पावसामुळे ‘एमयूएचएस’ (MUHS) म्हणजेच आरोग्य विद्यापीठाच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences ) ७ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी राज्यभरात आयोजित केलेल्या सर्व विद्यापीठ परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप सीताराम कडू यांनी या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक (परिपत्रक क्र. ५७/२०२६) जारी केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांचे डीन आणि प्राचार्यांना पाठवण्यात आले आहे.

मुख्य कारण आणि पार्श्वभूमी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात विद्यार्थी आणि विविध स्तरांतून विद्यापीठाकडे निवेदने प्राप्त झाली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन सक्षम प्राधिकरणाने तातडीने मंगळवार, ७ जुलै रोजीच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय लागू आहे. हा निर्णय कोणत्याही एका विशिष्ट भागापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुढील अपडेट आता…

सुधारित परीक्षांचे वेळापत्रक किंवा पुनर्नियोजित तारखांची माहिती विद्यापीठामार्फत लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
सर्व संलग्न महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला या परिपत्रकाची माहिती तात्काळ संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. विद्यार्थ्यांनी पुढील अपडेट्ससाठी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.