नागपूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेनबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गुजरातमधील या मार्गाचे काम जलदगतीने सुरू असून, लवकरच पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची कामे कधीपर्यंत होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच महत्त्वाची माहिती दिली होती. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणार असे सांगितले. मात्र, जपानी दूतावासातील राजकीय व्यवहार मंत्री नोरियाकी आबे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुढील ५ वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बुलेट ट्रेनला विलंब होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर येथे आयोजित विशेष सत्रात आबे यांनी ही माहिती दिली. यावेळी जपानी दूतावासाचे वरिष्ठ राजकीय सल्लागार सी. आर. जयचंद्रन देखील उपस्थित होते.

२०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार बुलेट

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मार्गातील तीन स्थानकांचे काम सन २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होण्याच्या आर्थिक मूल्यांचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाच्या भोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरिता आराखडा तयार करण्यात येईल.

औद्योगिक पट्ट्याला थेट लाभ

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ ब या १४ हजार ९०७ कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून, त्यात राज्य शासनाचा ५० टक्के आर्थिक सहभाग आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत बदलापूर-कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे ६९ किमीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पुणे-लोणावळा ३ आणि ४ मार्गिकेच्या ५ हजार १०० कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड आणि आकुर्डी, तळेगाव या औद्योगिक पट्ट्याला थेट लाभ होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा

दरम्यान, बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा असणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर वापी ते अहमदाबाद मार्ग सुरू होईल. हे सगळे मार्ग प्रवासी सेवेत आल्यावर ठाणे ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावेल. तर, सगळ्यात शेवटी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगितले जात आहे