अमरावती: अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा पुन्हा एकदा आठवड्यातून पाच दिवस सुरू होणार आहे, पण त्यासाठी प्रवाशांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून दर आठवड्याला पाच दिवस ही सेवा उपलब्ध होऊ शकेल.

२५ ऑगस्टपासून झाला होता बदल

अमरावतीच्या बेलोरा येथील विमानतळावरून मुंबई-अमरावती विमानसेवा १६ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली होती. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून चार दिवस होती. पण, मे २०२६ पासून विमानसेवा चार वरून पाच दिवस करण्यात आली. या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. पण, ही सेवा पुरवणाऱ्या अलायन्स एअर कंपनीने ‘ऑपरेशनल’ कारण दर्शवून ही सेवा पुन्हा चार दिवस करण्याचा निर्णय घेतला होता. हा बदल २५ ऑगस्टपासून झाला.

नवीन वेळापत्रकानुसार बुकिंग सुरू

अलायन्स एअरने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना ई-मेल पाठवून वेळापत्रकातील बदलाविषयी माहिती दिली होती. दीपक कपूर यांनी त्यानंतर समाज माध्यमांद्वारे प्रवाशांना २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत आठवड्यातून चारच दिवस विमानसेवा सुरू राहील, अशी सूचना दिली होती. आता ४ ऑक्टोबरपासून आठवड्यातून पाच दिवस विमान प्रवासाचे बुकिंग सुरू झाले आहे.

वेळेत बदल नाही

सध्या दर आठवड्याला रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे चार दिवस मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरू आहे. ४ ऑक्टोबरपासून दर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. विमानाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई विमानतळावरून सकाळी ७.०५ वाजता विमान उड्डाण घेते आणि सकाळी ८.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहचते. तर परतीच्या वेळी अमरावती विमानतळावरून सकाळी ९.१५ वाजता विमानोड्डाण होते आणि सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर पोहचते.

प्रवास भाडे वाढले

विविध कारणांमुळे प्रवाशांना या विमानसेवेसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. सध्या सामान्य प्रवास भाडे हे ३ हजार ४०० रुपये ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. गर्दीच्या वेळी त्याहून अधिक पैसे मोजावे लागतात. अलायन्स एअरने सुरूवातीला अमरावती ते मुंबई प्रवासाचे तिकिटाचे किमान दर २ हजार १०० रुपये इतके ठेवले होते. पण गर्दीच्या दिवशी जास्त रक्कम मोजावी लागत होती. आता सामान्य दर दुपटीने वाढले आहेत.