नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) येथील पुनर्विकास कामामुळे विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुढील तीन महिने बदललेल्या वेळापत्रकाचा सामना करावा लागणार आहे. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीमार्फत सीएसटीएम स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे अमरावती व बल्लारशहा येथून निघणाऱ्या दोन प्रमुख रेल्वेगाड्या सीएसटीएमऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. ही व्यवस्था १ फेब्रुवारीपासून २६ एप्रिल २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
सीएसटीएमवरील फलाट क्रमांक १६ व १७ येथे पुनर्विकासाशी संबंधित महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत फलाटांची संरचनात्मक दुरुस्ती, सिग्नल प्रणालीत सुधारणा तसेच प्रवासी सुविधांशी संबंधित पायाभूत कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी हे दोन्ही फलाट तब्बल ८५ दिवस बंद ठेवण्यात येणार असून, त्या कालावधीत येथून होणारी सर्व रेल्वे वाहतूक स्थगित राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या टर्मिनस स्थानकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भातून येणारी गाडी क्रमांक १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११००२ बल्लारशहा-सीएसएमटी नांदिग्राम एक्सप्रेस या गाड्या सीएसटीएमऐवजी दादर स्थानकावरच थांबवण्यात येणार आहेत. त्यामुळे सीएसटीएमपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दादरहून पुढील प्रवासासाठी उपनगरी रेल्वे किंवा इतर वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे.
याशिवाय फलाट क्रमांक १६ व १७ वरून ये-जा करणाऱ्या इतरही काही गाड्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, २२१४४ बीदर-सीएसएमटी एक्सप्रेस, २२१०८ लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस तसेच २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या वेळापत्रकात व थांब्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सीएसटीएमच्या पुनर्विकासामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्या तरी सध्या मात्र या तात्पुरत्या बदलामुळे विशेषतः विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

