नागपूर : सुट्टीच्या काळात मुंबई–नागपूर मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूरदरम्यान विशेष सुपरफास्ट गाड्यांच्या चार फेऱ्या होणार आहेत.
२ आणि ४ ऑक्टोबरला मुंबईहून सुटणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०२१४१ ही २ ऑक्टोबर (शुक्रवार) आणि ४ ऑक्टोबर (रविवार) रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३.३५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या दोन सेवा नियोजित करण्यात आल्या आहेत.
नागपूरहून दुपारी ४.५० वाजता प्रस्थान
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०२१४२ ही २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून दुपारी ४.५० वाजता सुटणार आहे. ही विशेष गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या दोन सेवा असतील.
मार्गावर महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे
विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. नागपूरहून मुंबईकडे धावणाऱ्या गाडी क्रमांक ०२१४२ ला इगतपुरी येथेही थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक, खान्देश, विदर्भ आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष सेवांचा लाभ घेता येणार आहे.
२२ डब्यांची विशेष गाडी
विशेष गाडीमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणीचे चार डबे, शयनयान श्रेणीचे ११ डबे आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे पाच डबे असतील. याशिवाय द्वितीय आसन श्रेणीसह दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी एकूण २२ डब्यांची संरचना असेल. या विशेष गाड्यांसाठी आरक्षणाची प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०१०२९, ०२१४१ आणि ०२१४२ साठी आरक्षण सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. सुट्टीच्या कालावधीत नियमित गाड्यांवरील वाढता प्रवासी भार लक्षात घेता या विशेष सेवांमुळे मुंबई–नागपूर मार्गावरील प्रवाशांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.
