नागपूर : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी दिली. मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या ९० मिनिटात शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-पुणे प्रवासात आता अडीच ते तीन तासात होतो. या प्रवासात मोठा वेळ जातो. घाटामध्ये ट्रॅफिक जाम असेल तर मग विचारायलाच नको. मात्र, आता मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या ९० मिनिटात पार करता येणार आहे. म्हणजे मुंबईकरांना पुण्यात काम असेल आणि पुणेकरांना मुंबईत काम असेल तर सकाळी जाऊन सायंकाळी त्यांना परत येता येणार आहे. इतक्या सुपरफास्ट हा प्रवास होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी विधानभवनात आले होते. यावेळी परिसरात बोलताना त्यांनी मुंबई पुणे प्रवास ९० मिनिटांत शक्य होईल असे जाहीर केले. येत्या वर्षभरात राज्यात दीड लाख कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून, त्यातील तब्बल ५० हजार कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या कामांमध्ये पुणे आणि मुंबईकरांचे आयुष्य अधिक वेगवान बनवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुणे-मुंबई आणि पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प जाहीर केला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेला जोडून एक सामायिक एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येत आहे. हा ग्रीनफिल्ड लिंक अटल सेतू ते जेएनपीटी चौक ते पुणे-शिवार जंक्शन असा १३० किलोमीटरचा असेल. एकट्या पुणे जिल्ह्यासाठी गडकरींच्या मंत्रालयांतर्गत सुमारे ५० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत, जी येत्या तीन महिन्यांत सुरू होतील, असा दावा त्यांनी केला. यामध्ये अनेक महत्त्वाच्या एलिव्हेटेड प्रकल्पांचा समावेश आहे. यात तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा ४ हजार २०७ कोटी रुपयांचा चार स्तरावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
यात खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्ग असेल. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हडपसर ते यवत ५ हजार २६२ कोटींचा हा प्रकल्प एलिव्हेटेड स्वरूपाचा असणार आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. दरम्यान, मुंबई-पुणे अंतर ९० मिनिटात कापता येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी विधानभवन परिसरात बोलताना सांगितले.
