सुनीता झाडे
शहरानजीकच्या वाड्या-वस्त्यातून, गाव-पाड्यातून शहराला जाग देणारे आवाज येत असतात. काही आवाज सकाळी, काही सुस्त दुपारनंतर, काही संध्याकाळच्या मंद होत जाणाऱ्या कोलाहलात जाग देत राहतात. त्यांच्याकडे लक्ष दिलं, नाही दिलं; त्यांच्याकडून काही घेतलं, नाही घेतलं तरी ते आवाज देत राहतात. या आवाजात सकाळचा पेपरवाला असतो, नंतरचा रद्दीवाला, भंगारवाला, झाडू-खराटे-पायपोसवाला, भाजीवाला, धने-जिरे-मसालेवाला, गॅस दुरुस्ती, हरेकमालवाला, चादर-कपडे-पेटीकोट-गाऊनवाला, लहान मुलांची खेळणी विकणारा, जुन्या कपड्यांवर, केसांवर भांडी देणारा, सायकलमागे मोठ्याशा टोपल्यात भांडी बांधून विकणारा आणि भांड्यावर नाव लिहिणारासुद्धा… म्हणजे असे अनगिनत आवाज.

कधीतरी एकामागून एक येणाऱ्या आवाजाने एक सुरावळ तयार होत, वर आरोहात निनादत जाते. याची रचनाही फार सोपी असते. एखाद्या वस्तू, विषय, पदार्थासमोर ‘वालाऽऽईंऽऽ’ अशी हाळी लावली की झाले. एक चाल लावून चालन तयार. मग चौका-चौकात, गल्ली-गल्लीत, आळी-चाळीसमोर आवाज देत, माल विकत एक चालती-फिरती बाजारपेठ तयार. मग या बाजारपेठेतील अशा अनेक प्रकारच्या दुकानांची ये-जा सुरू…

विशेष म्हणजे त्यांचा तो आवाज ते विकत असलेल्या मालासारखा येत असतो. कधीतरी कमाल वाटते ऐकून. अगदी कान देऊन ऐ रद्दी पेपरवाला, ऐ भंगारवाला, लै हरेकमालवाला, लै भाजीवाला असे आवाज ऐकले तर लक्षात येईल, यांच्या आवाजातून यांच्याजवळच्या साज-सामानांचे आवाज येत असतात. पाणीपुरी, आईसगोला, कुल्फी, इडली-सांबर, खमंग ढोकळा… यांची तर आवाजासह चव ऐकू येते. उन्हातान्हात या सर्वांना अशी उघड्यावर रोजंदारी करताना पाहून बरेचदा बरेच मूलभूत प्रश्न पडतात. पण फक्त प्रश्नच पडतात.

उत्तरात इकडे आपली रोजंदारी बुडायला लागते म्हणून मग… इथून-तिथून साऱ्यांचा राबत्या हातावर कब्जा. तर रोजंदारीच्या दिवसाच्या भल्या सकाळी घरासमोरच्या रस्त्यावरून ‘मुरमुरे-फुटाणे’ असा आवाज येतो. आवाज मुरमुरे-फुटाण्यासारखा खरमरीत, कुरकुरीत, करारी असतो. जरा बाहेर डोकावून पाहिले तर नऊवारीतील एक बाई मुरमुऱ्यांची दोन पोती डोक्यावर, खाली हातात फुटाण्याची पिशवी घेऊन आवाज देताना दिसते. ठरलेल्या घरासमोर थांबत जरा अधिक जोरात आवाज देत असते.

सकाळच्या सुस्त अशा सोसायटीत बराच वेळ तिचा आवाज गुंजतो, तसे वेळेचे भान येते. हालचालींना वेग येतो. तिच्याकडे पाहिल्यावर बाहेरच्या उन्हाची पर्वा वाटत नाही. जवळच्या सर्व अभावांबद्दल शांती वाटते. दिवसाची पहिली शाळा संपन्न होते. मुरमुरे-फुटाण्यांना तिखट-मीठ लावून सकाळ सुखद होत धावू लागते. तस आठवतं, वस्तीत एक उंच शिडशिडीत माणूस हातात सायकल घेऊन “ऐंऽऽ बर्तनोंपर नाम लिखवा लो…” म्हणत सकाळी-सकाळी फेरी मारायचा. त्याच्याकडे पाहिले की तो ‘बर्तन इस्टेट’ असलेल्या राज्याची गोष्ट वाटायचा. म्हणजे भांड्याला भांडे लागणे, भांड्याच्या वाटण्या होणे, भांड्यांसाठी भांडण होणे… या काळचा. अद्याप कुठे-कुठे असे घडतही असेल, तरी मी कधी कोणाला त्याच्याकडून भांड्यावर नाव लिहून घेताना पाहिले नाही.

आता तर ‘तुझी वाटी, माझा चमचा’ असे भांडणातले भांडेही बाद झालेत. आता भांडे, भांडण दोन्हीचे स्वरूप बदलले. तरी भांड्यावर नाव लिहून घेणाऱ्यावर त्याचा विश्वास आहे. अधूनमधून वस्तीत अजूनही सकाळच्या वेळी त्याचा आवाज येतो. “ऐं बर्तनों पर नाम लिखने वाला… बर्तनों पर नाम लिखवाना है क्या? बर्तनों पर नाम लिखवा लो बाई…” म्हणत सायकलसह आवाज देत उभा. भांड्यावर नाव लिहिताना थरारत्या सुईच्या आवाजासारखा त्याचा आवाज भांड्याभांड्यातून आरपार थरारत पुढे जाणारा…

पूर्वी ‘दही’ एवढे दोनच शब्द गुंजावत दहीवाले यायचे. क्वचित एखादा सायकलवर, अन्यथा पायीच. डोक्यावर टोपलं, त्यात मोठा जर्मनचा गंज. गंजाच्या कडेला माप अडकवलेलं, वर ताटली. दही काढायला नारळाची वाटीही आठवते. यांची एक ठरलेली वेळ असायची. त्या वेळेत गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांचा “दऽऽहीऽऽ” असा आवाज गुंजायचा. तसे लहान-थोर सगळे भांडं घेऊन दही घेण्याच्या तयारीत असायचे.
हे दहीवाले बाया-माणसे लहान मुलांसाठी मोठी गंमत असायचे. ते दहीवाल्यांना बघायचे आणि त्यांच्या माघारी पिटुकली वाटी, गंजोली डोक्यावर घेऊन असेच “दऽऽहीऽऽ – दऽऽहीऽऽ” करायचे. घरच्यांनाही त्यांच्या या बालसुलभ कौशल्याचे मोठे अप्रूप वाटायचे, मग तेही या खेळात सामील व्हायचे.

बाळ गंमत-गंमत घरातल्यांना, कधी घरात आलेल्या पाहुण्यांना खोटे-खोटे दही विकत द्यायचे. नुकतेच शिकलेल्या अंकांचे मोडके-तोडके पण बेभाव गणित मांडायचे. यातून मुलं शिकत जायची, शहाणी व्हायची. या शाळेतून त्यांना बाजार, व्यवहार शिकता यायचा. म्हणतात ना, मुलं समाजमनाचा आरसा असतात. आपला सामाजिक भवताल कसा आहे हे मुलांच्या वर्तणुकीतून, सामाजिक कृतीतून लक्षात येते. आपण कसे आहोत हे दाखवणारे विद्यापीठ म्हणजे आपली मुलं. नुकताच एका पॅलेस्टिनी कंटेंट क्रिएटरने गाझा पट्टीतील विस्थापित कॅम्पमधील लहान मुलांचा एक व्हिडिओ शेअर केला, जो नंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

या व्हिडिओत काही लहान मुलं एका बाहुलीला स्ट्रेचरवजा पाटीवर झोपवत तिला मयत झाल्यासारखे घेऊन जात असल्याचे दिसत होते… जे हृदयद्रावक होतं. मुलांना आपण काय करतोय कळत नव्हते, पण ते बघताना ते का करीत असतील याची तीक्ष्ण जाणीव होते. सतत युद्धाच्या सावटातील मुलं, मृत्युमुखी पडत असलेले आप्तस्वकीय, त्यांच्या जाण्याचा शोक, त्यांची अंत्ययात्रा… याचे सातत्याने पडणारे प्रतिबिंब मुलांच्या या खेळात दिसून येत होते. सभोवताली जे घडतं, मुलं त्याचे अनुकरण करतात. जसे शाळा-शाळा, ऑफिस-ऑफिस, घर-घर खेळले जाते, तशी ही मुलं मृत्यू-मृत्यू खेळत होती. अजूनही खेळत आहेत; कारण युद्ध सुरूच आहे. मानवीय पर्यावरणाचा इतका संहार झाल्यानंतरही त्यांना जाग येत नाही आहे.

तर आपण आपल्या शहराला जाग देणाऱ्या आवाजाबद्दल बोलत होतो… तसा दिवसा अखेर जरा ऊन निवाल्यावर एक भाजीवाला येऊन गेला. त्याच्या आवाजातून सांबार, मिरची, काकडी, टमाटर… “अंबाडी भाज्जी” असा आवाज आला. रितीभातीप्रमाणे ‘हे कितीला? ते कितीला?’ सुरू झाले. तसा तो सराईतपणे, “हे इतक्यात आणलं, ते तितक्यात. या भावाची तर खरेदी आहे बाई मालाची. इतक्यात तर घरात पडला जी… परवडत नाही जी भाजी विकाले. पेट्रोलमुळे आवक महागली. यंदा तर पाऊस बी नाय दिसत. काय पिकल अन काय विकल? आहे ते खाऊन घ्या. यानंतर तर इथेनॉलच पिकणार आहे शेतात…” मी ताटात इथेनॉल पाहते.