नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका बघता आणि करोनामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला महापालिकेचा अर्थसंकल्प यावर्षी २८ मे रोजी सर्वसाधारण सभेत ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षभरात करोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी होऊन विकासकामे थांबली आहेत. पुढील वर्ष हे महापालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेची ऑनलाईन विशेष सभा २८ मे रोजी सकाळी १०.०० वाजता स्व.डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे होणार आहे. या सभेत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर सन २०२०-२१ चे सुधारित व सन २०२१-२०२२ चे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करणार आहे. गेल्या वर्षभरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला असून त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर झाला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प ऑनलाइन सादर करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २ हजार ६०७.६० कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला होता. तसेच २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात २ हजार १६९.५९ कोटींची महसूल वाढ अपेक्षित होती. तर २६४.०४ शिलकीत दाखवण्यात आले होते. त्यामुळे २०२०-२१ या वर्षासाठीचे उत्पन्नाचे सुधारित लक्ष्य २ हजार ४३३.६३ कोटी इतके दाखवण्यात आले. या अर्थसंकल्पानंतर स्थायी समितीने विविध विभागांशी बैठका घेत अंतिम अर्थसंकल्प तयार केला. गेल्या काही दिवसात  शहरात सुरू असलेल्या व सध्या अर्धवट स्थिती असलेल्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकल्पांना निवडणुकीपूर्वी पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याला पक्षाच्या वतीने प्राधान्य राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.