यवतमाळ : नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, शहरातील काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांसह विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या मिळत आहे. यवतमाळ येथील प्रभाग क्र. १७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले अपक्ष उमेदवार भारत पुष्पा दिगांबर ब्राम्हणकर यांनी अज्ञात लोकांकडून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. धमकीचे गांभीर्य लक्षात घेवून भारत ब्राह्मणकर यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून, बंदूकधारी  पोलीस शिपाई पूर्णवेळ त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केला आहे.

यवतमाळच्या इतिहासात पहिल्यांदाच नगर परिष निवडणुकीत अपक्ष उमेदवार चक्क पोलीस संरक्षणात प्रचार करत असल्याचे चित्र या निमित्ताने नागरिकांना बघायला मिळत असून, धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी शोधून काढण्याची मागणी होत आहे. शहरातील भोसा परिसरात महाजन ले आऊटमध्ये राहणारे भारत ब्राम्हणकर, यांनी प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात लोकांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी विविध धमक्या देण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर देखील त्यांच्या सहकाऱ्यांना, विभागातील त्यांच्या समर्थक महिला भगिनींना धमकावणे, शिव्या व विविध प्रकारे बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच, उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबाची वेगवेगळ्या प्रकारे बदनामी व फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराने आपले कुटुंबिय भीतीच्या सावाटाखाली वावरत असून, अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध तक्रार देवून संरक्षण देण्याची मागणी केली.

भारत ब्राह्मणकर यापूर्वी भाजपात सक्रिय होते. पक्षाने त्यांना उमदेवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल केल्यानंतर भारत ब्राह्मणकर यांना २२ नोव्हेंबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी पक्षातून निलंबित केले. प्रभाग क्र. १७ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत भारत ब्राह्मणकर यांना निलंबित करण्यात आले. तर यासंदर्भात भाजप नेते, यवतमाळचे माजी आमदार मदन येरावार यांनीही एक व्हिडीओ प्रसारित करून, भारत ब्राह्मणकर यांची कामे खेचून आणण्याची हातोटी नसून, त्यांच्या भूलथापांना मतदरांनी बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक प्रभागातील अपक्ष व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना प्रेमाने समजावून किंवा धमक्या देवून नामांकन मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. 

अपक्ष उमेदवार भारत ब्राह्मणकर यांनी त्यांना धमक्या येत असल्याची तक्रार दिली असून, संरक्षणाची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या विनंतीवरून त्यांना संरक्षण पुरविण्यात आले असून, त्यासाठी त्यांच्याकडून नियमाप्रमाणे मोबदला आकारला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले.