अमरावती : एरवी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मालमत्ताधारकांना तेवढी घरपट्टी, पाणीपट्टी लवकरात लवकर भरा अशी विनवणी करावी लागते. त्यावेळी मालमत्ताधार बघावे लागेल, मी भरले असावेत? अताच तर भरले होते, चालू वर्षाचे बिल लगेच कसे आले?, थकबाकी जरा जास्तच आहे अशा नाना प्रश्नांचा भडिमार करतात.
त्याचबरोबर शहरात स्वच्छता नाही, रस्ते कसे झालेत पहा ? पथदीप कधीचे बंद आहेत अशा तक्रारींचा सूरही आळवतात. आता मात्र तसे चित्र नाही अगदी मालमत्ताधारकांकडून विनवणी करून थकबाकीचा भरणा होत आहे. निवडणुकीने सर्व चित्र बदलले आहे.
जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरपालिकेची थकबाकी चुकती करण्यासाठी कार्यालयात रिघ लागली आहे. त्याचसोबत जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी यासारख्या आवश्यक कागदपत्रांसाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक धावपळ करताना दिसत आहेत.
नगरपालिकांची मालमत्ताधारकांकडे लाखोंची थकबाकी आहे. साधारणपणे आर्थिक वर्षाच्या अखेरीस करभरणा करणाऱ्यांची संख्या वाढते, पण यंदा निवडणूक असल्याने मार्च महिन्यात होणारी गर्दी नोव्हेंबरमध्येच झाली आहे.
आमच्याकडे काही थकबाकी नाही ना ? असेल, तर कृपया एकदा बघून घ्या, अशा प्रकारचे विनम्र शब्द सध्या नगरपालिका कार्यालयांमध्ये ऐकायला येत आहेत. सहसा असे होत नाही. नगरपालिका प्रशासन मार्च अखेर ‘कर भरा, सहकार्य करा’ असे आवाहन भोंगा लावून करते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. आता नगरपालिका निवडणूक असल्याने थकबाकी भरण्यासाठी इच्छुकांकडून गर्दी होत आहे.
अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, चांदूरबाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, शेंदुरजनाघाट, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, या १० नगरपालिका आणि धारणी व नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारांचा तसेच सूचक आणि अनुमोदकांचा कोणताही कर थकीत नसावा, ही अट आहे.
नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यापूर्वी मागील तीन ते चार वर्षांची थकबाकीदेखील भरली जात असल्याने यंदा जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि २ नगरपंचायतींच्या महसूल वसुलीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित केली आहे.
