अकोला : नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीसाठी आज, २ डिसेंबरला मतदानाच्या प्रक्रियेला सकाळी ७.३० वाजतापासून सुरुवात झाली. दुपारनंतर मतदानाची गती वाढली असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. अकोला जिल्ह्यात १.३० वाजेपर्यंत ३४.५९ टक्के मतदान झाले, तर वाशीम जिल्ह्यात ३१.८२ टक्के मतदारांनी हक्क बजावला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणूका तब्बल नऊ वर्षांनंतर होत असून आज सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, हिवरखेड नगर पालिका व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी निवडणूक होत आहे. बाळापूर वगळता इतर सर्व ठिकाणी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगरपालिका आणि मालेगाव नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. वाशीम नगरपालिका वगळता इतर सर्वच ठिकाणी मतदान केले जात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण ८२ हजार ३२५ मतदार आहेत. दुपारी १.३० वाजेपर्यंत त्यातील २७ हजार ६१३ मतदारांनी मतदानाचा धक्क बजावला. ३३.५४ त्याची टक्केवारी आहे.

मूर्तिजापूर नगरपालिकेचे सर्वात संथ मतदान सुरू आहे. १.३० वाजेपर्यंत ३०.४६ टक्के मतदान झाले. ४० हजार ०४९ मतदार असून त्यापैकी १२ हजार १९९ मतदारांनी मतदान केले. तेल्हारा नगरपालिकेत एकूण मतदार १८ हजार २४७ असून त्यापैकी ३४ टक्के म्हणजेच सहा हजार २०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिवरखेड नगरपालिकेत २० हजार १७२ मतदार असून पहिल्या सहा तासांमध्ये ४०.०२ टक्के मतदान झाले. आठ हजार ०७३ मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक ४१.८७ टक्के मतदान बार्शीटाकळी नगर पंचायतीसाठी झाले आहे. एकूण २० हजार ९४७ मतदारांपैकी आठ हजार ७७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

वाशीम जिल्ह्यात संथ गती

वाशीम जिल्ह्यात सहा तासांमध्ये ३१.८२ टक्के मतदान झाले. रिसोड नगरपालिकेसाठी एकूण मतदार २९ हजार ९६२ असून त्यापैकी ३७.११ म्हणजेच ११ हजार ११९ मतदारांनी मतदान केले. मंगरुळपीर नगरपालिकेतील मतदार संख्या २९ हजार ११९ असून नऊ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ३२.१३ आहे. कारंजा नगरपालिका सर्वात मोठी असून ७० हजार ३३१ एकूण मतदार आहेत. त्यातील २८.९५ टक्के २० हजार ३५८ मतदारांनी मतदान केले. मालेगाव नगर पंचायतीमध्ये १९ हजार १६९ मतदार असून त्यातील ३३.६० टक्के म्हणजेच सहा हजार ४४१ मतदारांनी मतदान केले आहे.