जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक ’ पालकमंत्री सचिवांकडे कारवाईची शिफारस करणार
नागपूर जिल्ह्य़ातील अनेक भागात डेंग्यू, हिवताप, गॅस्ट्रोसदृष्य संसर्गजन्य आजारांनी थैमान घातले आहे. त्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची रविभवनात बैठक घेतली. त्याला नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह मेडिकल व मेयोच्या अधिष्ठात्यांनीही दांडी मारल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित विभागाच्या सचिवांकडे त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. रुग्णांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, नागपूर महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, मेडिकलचे प्रतिनिधी डॉ. गिरीश भुयार, डॉ. पिनाक दंदे, डॉ. अनुप मरार यांच्यासह इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असून त्यात मेडिकल, मेयोच्या अधिष्ठात्यांसह नागपूर महापालिका व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह काही अशासकीय सदस्य अशा ३२ सदस्यांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील संसर्गजन्य आजारांवर चर्चा असल्याने त्यात मेडिकल व मेयोच्या अधिष्ठात्यांसह शहरातील आरोग्याची जबाबदारी असलेल्या नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु काही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पुढे आले. त्यावर संताप व्यक्त करीत पालकमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण व नगरविकास विभागाच्या सचिवांकडे या गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करणार असल्याचे सांगितले. बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरगाव येथे गॅस्ट्रोने मृत्यू पावलेल्या रुग्णांबाबत नाराजी व्यक्त केली. पाणी स्वच्छतेच्या बाबतीत ज्यांनी निष्काळजीपणा केला. त्यांच्यावर कारवाईच्या सूचना याप्रसंगी केल्या.
डासांचे प्रमाण कमी करण्याकरिता येत्या आठ दिवसांत नागपूर जिल्ह्य़ांतील सगळ्याच भागात फॉगिंग करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी, महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने साथीचे आजार रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांचा तपशील दररोज रात्री आठ वाजता ई-मेलवर पालकमंत्री कार्यालयात देण्याच्या सूचनाही याप्रसंगी केल्या. रिकामे भूखंड, नाल्या यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा निपटारा करणे गरजेचे आहे.
उघडय़ावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, ग्रामसेवक, शिक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात स्वच्छतेच्या बाबतीत गावकऱ्यांना प्रबोधन करावे, विशेषत: विद्यार्थ्यांना या कामात गुंतवावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

.