अकोला : शहरातील मोर्णा नदी व परिसराच्या स्वच्छतेसाठी अकोला महापालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नदी परिसरात स्वच्छता करून त्याला प्रारंभ करण्यात आला. अकोला महानगरपालिकेव्दारा स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत २२ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दररोज सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत शहरातील मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदीच्या राजराजेश्ववर मंदिर ते गडंकी पर्यंतच्या परिसराची मनपा अधिकारी व कर्मचारी विशेष स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यामध्ये नदी व परिसराची स्वच्छता करण्यात येत असून जलकुंभ काढण्यात येत आहे. अकोला शहर स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी मोहिमेमध्ये सहभाग होण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या घरात व प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून शहरात ईतरत्र न टाकता मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकावे, शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करावा. स्वच्छता पंधरवाडांतर्गत मनपा प्रशासनाद्वारे शहरातील सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. कचरा घंटा व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.



