नागपूर : घरातील कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी वाढल्यानंतर महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली ‘क्यू.आर.कोड’ योजना काही दिवसातच बारगळल्याची माहिती हाती आली आहे. ज्या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले तिच्यासोबत रितसर करारच करण्यात न आल्याने कंपनीने काम थांबवल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील कचऱ्यांची उचल करण्याचे काम महापालिकेने ‘एव्हीजी’ आणि ‘बीव्हीजी’ या कंपनीकडे दिले आहे. या कंपनीचे कर्मचारी घराघरातून कचरा उचलत नाही, अशा तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘क्यू आर कोड’ योजना सुरु करण्यात आली. धरमपेठ आणि गांधीबाग झोनअंतर्गत काही भागात ‘क्यू.आर. कोड’ स्टीकर लावण्यात आले. या नवीन व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे काम थांबले आहे. त्याचा पाठपुरावा केला जात नाही, हे येथे उल्लेखनीय.
महापालिका बरखास्त होण्यापूर्वी सत्ताधारी भाजपने या योजनेचा मोठा गाजावाजा केला होता.
तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले. मात्र, महापालिकेची सूत्रे प्रशासक म्हणून आयुक्तांकडे आल्यावर त्यांनी योजनेचा पाठपुरावाच केला नाही. एवढेच नाही तर, या संदर्भात एकही बैठक झाली नाही. ज्या घरांवर ‘क्यू. आर. कोड’चे स्टीकर लावण्यात आले तेथूनही नियमित कचरा उचलला जात नाही, अशी नागरिकांची ओरड आहे.
दोन झोनमध्ये लावले स्टीकर्स
धरमपेठ भागात ५० पेक्षा अधिक घरांवर आणि गांधीबाग झोनतंर्गत इतवारी भागात ४० घरांवर ‘क्यू.आर. कोड’ स्टीकर लावण्यात आले.
घराघरातून कचऱ्याची उचल करण्यासाठी ‘क्यू. आर. कोड’ ही योजना शहरात राबवण्यात येणार होती. या योजनेचे संचलन व देखरेख ठेवण्याची जबाबदारी घनकचरा विभागावर होती. योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घ्यावी लागेल. – डॉ. गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी, (घनकचरा)