नागपूर : चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील विविध भागात टँकरची संख्या कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात ३४६ पैकी १२० टँकर बंद करण्यात आले. परंतु, आता पाणीटंचाईचे कारण सांगत पुन्हा त्यातील ११० टँकर सक्रिय झाले असून टँकर लॉबी कामाला लागली आहे. शहरातील टँकरमुक्त झालेल्या प्रभागात टँकरची संख्या वाढल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

महापालिकेकडून ३४६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जायचा. त्यावर दरवर्षी २८ कोटी रुपये खर्च व्हायचे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी १२० टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेत १० ते ११ कोटींची बचत केली होती. शिवाय महापालिकेतील टँकर लॉबी संपुष्टात आणली होती. आता पुन्हा टँकरची संख्या वाढवण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. पूर्व, मध्य व दक्षिण व पश्चिम नागपुरातील अनेक प्रभाग टँकरमुक्त करण्यात आले होते. आता या भागात टँकरची संख्या वाढवण्यात आली आहे. तेथे दररोज ८० ते १०० टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. माजी जलप्रदाय समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या प्रभागातील एका भाग टँकरमुक्त आहे. मात्र त्याठिकाणी दिवसाला ८० ते ९० टँकरच्या फेऱ्या होत आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये दूषित पाणी येत असल्यामुळे या भागात गेल्या आठ दिवसांपासून दररोज १०० ते २०० टँकरच्या फेऱ्या होत आहेत. मे महिन्यात टँकरच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

खासगी टँकरचालकांची मनमानी

अनेक भागात अजूनही रस्ते खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहेत. वस्तीमध्ये टँकर वेळेवर येत नसल्यामुळे चालकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तिकडे खासगी टँकरचालकांची मनमानी सुरू आहे. महापालिका आणि ओसीडब्ल्यूकडे टँकरची स्वतंत्र व्यवस्था असताना काही खासगी टँकरचालक मनमानी करीत असून पैसे देऊनही टँकर वस्त्यांमध्ये पोहोचत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.