खाद्यविक्रेत्यांवर महापालिका पथकाची ‘अर्थकृपा’!; लाखोंच्या उत्पन्नातील मोठा वाटा पथकाकडे?; आयटी पार्क ते माटे चौक मार्गावरील खाद्यविक्री पुन्हा सुरू | Municipal team financial favor food vendors large share income Food resumption IT Park ysh 95 | Loksatta

खाद्यविक्रेत्यांवर महापालिका पथकाची ‘अर्थकृपा’!; लाखोंच्या उत्पन्नातील मोठा वाटा पथकाकडे?; आयटी पार्क ते माटे चौक मार्गावरील खाद्यविक्री पुन्हा सुरू

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी जवळपास दीडशेवर दुकाने रोज लागतात.

खाद्यविक्रेत्यांवर महापालिका पथकाची ‘अर्थकृपा’!; लाखोंच्या उत्पन्नातील मोठा वाटा पथकाकडे?; आयटी पार्क ते माटे चौक मार्गावरील खाद्यविक्री पुन्हा सुरू

नागपूर : आयटी पार्क ते माटे चौकापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी जवळपास दीडशेवर दुकाने रोज लागतात. या खाद्यविक्रेत्यांनी आपला एक नेता निवडला असून त्याच्या माध्यमातून  महापालिकेच्या अतिक्रमन विरोधी पथकाशी अर्थपूर्ण तडजोड केली जात असल्याची माहिती आहे. येथील एक विक्रेता दिवसाला सुमारे २० हजारांचा व्यवयाय करीत असल्याने रोज येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यातील मोठा वाटा  हे खाद्यविक्रेते महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला देत असल्याने हे पथक एकदा कारवाईचा देखावा करून नंतर इकडे फिरकतच नसल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

आयटी पार्क ते माटे चौक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महापालिका किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आवश्यक परवानगी घेतलेली नाही. तरीही थेट रस्त्याच्या कडेला आणि पदपाथावर हातठेले सजवून खाद्यपदार्थ विक्री सर्रास सुरू आहे. पदपाथावरच दुकानदारांनी खुर्च्या आणि टेबल लावले असून तेथेच ग्राहकांची बसण्याची व्यवस्था केली आहे. हातठेल्यावर येणारे बहुतेक ग्राहक हे कार किंवा दुचाकीने येतात. ते रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे अर्धाअधिक रस्ता वाहनांमुळे व्यापला जात असल्याने या रस्त्यावर सायंकाळपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीच्या कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेता ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. वृत्त प्रकाशित होताच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि वाहतूक पोलिसांनी ११ मे रोजी  संयुक्त कारवाई करीत साहित्य जप्त केले होते. या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुकही झाले. नंतर मात्र या विक्रेत्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाशी अर्थपूर्ण तडजोड करून पुन्हा दुकाने सुरू केल्याचा आरोप होत आहे.

कारवाई केल्याने ‘भाव’ वाढले

महापालिकेच्या पथकाने येथील विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर महिन्याकाठी अडीच ते तीन लाखांचे नुकसान होत होते. त्यामुळे विक्रेत्यांनी एकत्र बैठक घेतली. एका नेत्याला हाताशी पकडले. त्याच्या माध्यमातून महापालिकेच्या पथकाशी ‘तडजोड’ केली. पूर्वीपेक्षा जास्त भाव वाढवून घेतल्यानंतरच दुकाने लावण्यास हिरवा कंदील मिळाल्याची माहिती एका विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

वाहतूक पोलीस हतबल

वाहतूक पोलिसांना केवळ दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकदा  दंडात्मक कारवाई केली. मात्र, हे खाद्यविक्रेते किरकोळ  दंड भरून दुकाने पुन्हा सुरू ठेवतात. त्यामुळे वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत.

झोनच्या पथकांचा हद्दीचा वाद

महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनचे गणेश राठोड म्हणाले, हा परिसर आपल्याकडे येत नसून धरमपेठ झोनने कारवाई करणे गरजेचे आहे. तर धरमपेठ झोनचे प्रकाश वऱ्हाडे म्हणाले, काही भाग आमच्या हद्दीत नाही. उर्वरित भागात आम्ही कारवाई करू.  दोन्ही पथकांनी अशा पद्धतीने टाळाटाळ करीत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी आम्ही तेथे कारवाई केली आहे. लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोन कार्यालयाला अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पथकाने कारवाई न केल्यास किंवा तसा अहवाल प्राप्त न झाल्यास आम्ही कारवाई करू.

– अशोक पाटील, सहायक आयुक्त, महापालिका.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2022 at 00:02 IST
Next Story
करोना चाचणी केंद्र पुन्हा सुरू; बाधितांची संख्या वाढली