scorecardresearch

जुगाराच्या नादात निष्पापांची हत्या!

चायनिज खाद्य विकून रोज पाच ते १० हजार रुपयांची कमाई करणाऱ्या मदन अग्रवालला पैशांची आवक बघून जुगार आणि क्रिकेटच्या सट्टेबाजीचे व्यसन जडले.

मदन अग्रवालच्या कृत्याने उपराजधानी सुन्न

नागपूर : चायनिज खाद्य विकून रोज पाच ते १० हजार रुपयांची कमाई करणाऱ्या मदन अग्रवालला पैशांची आवक बघून जुगार आणि क्रिकेटच्या सट्टेबाजीचे व्यसन जडले. ते व्यसन एवढे वाढले की त्याच्यावर २० ते ३० लाखांचे कर्ज झाले. घरही बँकेने जप्त केले आणि त्याच्यावर इतरांना हजार-पाचशे रुपये उसणे मागण्याची वेळ आली. या लाचारीला कंटाळून त्याने पत्नी किरण आणि सोन्यासारखी दोन्ही मुले वृषभ आणि टिया यांचा चाकूने भोसकून निर्दयीपणे खून केला. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेमुळे उपराजधानी सुन्न झाली आहे. व्यसनाधीनता कोणत्या स्तराला जाऊ शकते, याचे हे दाहक उदाहरण. मदन अग्रवाल याचे दहा वर्षांपूर्वी किरण या युवतीवर प्रेम जडले. तिच्या प्रेमात वेडा झालेला मदन कुटुंबीयांच्या विरोधात गेला. किरणशी लग्न करून त्याने त्याचे प्रेमही सिद्ध केले. कुटुंबीयांनी अबोला धरल्यानंतर मदनला किरणनेच साथ दिली. दोघांनी मदन चायनिज फूड नावाने व्यवसाय सुरू केला.

कमी कालावधीत बक्कळ पैसा कमावला. वृषभ आणि टिया दोन्ही मुलांचा व्यवस्थित सांभाळ केला. वृषभ पाचवीत तर टिया पहिलीत शिकत होती. मुलांकडे बघून मदनच्या कुटुंबीयांनी त्यांची चूक पदरात घेतली. परंतु, याच दरम्यान पाच ते दहा हजारांची कमाई दिसत असल्यामुळे मदनला जुगार आणि क्रिकेट सट्टा खेळण्याचे व्यसन लागले. तो अनेकदा दुकान बंद ठेवून जुगार खेळायला जात होता. दिवसेंदिवस त्याचे जुगाराचे व्यसन वाढले. त्यामुळे व्यवसायातून येणारा पैसा जुगारात जाऊ लागला. पैसे संपल्यानंतर तो लोकांकडून उधारी घेऊन जुगार खेळायला लागला. एवढेच नव्हे तर त्याने क्रिकेट सट्टेबाजीसाठी स्वत:चे घर बँकेकडे गहाण ठेवले. त्यातून आलेल्या पैशातून काहींचे कर्ज दिले तर उर्वरित पैसे जुगारात हरला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्याने जवळपास २५ ते ३० लाखांचे कर्ज घेऊन तो पैसा जुगारात उडवल्याची चर्चा आहे. कर्ज देणारे त्याला वारंवार पैशांसाठी तगादा लावत होते. परंतु, व्यवसायातून होणारी कमाईसुद्धा करोनामुळे बंद झाली होती. कर्ज चुकवणे कठीण जात असल्याने शेवटी त्याने आत्महत्येचा घातक पर्याय स्वीकारला.

जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नी, मुलांवर  मी गेल्यानंतर कुणापुढे हात पसरण्याची वेळ येईल या विचाराने त्रस्त  मदनने संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा विचार केला. त्याने मनावर दगड ठेवून सर्वप्रथम पत्नीच्या गळय़ावर चाकू फिरवला. त्यानंतर सोन्यासारख्या मुलांच्याही तोंडावर हात ठेवून पोटात चाकूने वार केले. तिघांचेही मृतदेह डोळय़ासमोर असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली.  

अशी उघडकीस आली घटना

मदनचा मित्र त्याला भेटायला घरी आला. दार ठोठावल्यानंतरही तो प्रतिसाद देत नसल्याने त्याला संशय आला. त्याने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडले असता दोन्ही मुले आणि किरण एका बेडवर रक्ताच्या थारोळय़ात पडलेले दिसले, तर मदन गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder innocents gambling crime subcontinent ysh

ताज्या बातम्या