भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी बुधवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेऊन जवळपास चार तास विविध विषयांवर बंदव्दार चर्चा केली. मुरलीमनोहर जोशी यांच्या दौऱ्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना ते नागपुरात आल्याची माहिती नव्हती. गेल्या काही दिवसात त्यांना केंद्रीय कार्यकारिणीत फारसे महत्त्व दिले जात नसल्यामुळे सरसंघचालकांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी रात्री उशिरा जोशी नागपुरात आले. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांची ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात असले तरी दिल्लीमध्ये अधिवेशन असताना त्यांनी नागपूरला येऊन सरसंघचालकांची भेट घेणे याला विशेष महत्त्व आहे.
आगामी काळात उत्तरप्रदेशमधील निवडणुका आणि जेएनयू प्रकरणाबाबत सरसंघचालकांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुपारी १ वाजताच्या सुमारास ते दिल्लीला रवाना झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन मंडळाची स्थापन करण्यात आली होती. मात्र, या मंडळाची एकही बैठक झाली नाही. आता पुन्हा नव्याने शहा यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पुन्हा मार्गदर्शक मंडळाची स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मंडळाचे महत्त्व काय असेल याबाबत चर्चा आहे. गेल्या काही दिवसात पक्षामध्ये त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही, सरकार कुठलेही निर्णय घेत असताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही, यामुळे जोशी नाराज आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर त्यांनी सरसंघचालकांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.