नागपूर : वेग आणि तरुण यांचे नाते अतूट असते. त्यामुळे तरुणांमध्ये सुसाट वेगाने गाडी चालवण्याची क्रेझ वाढत आहे. मात्र हीच टू व्हिलर कशी जीवघेणी ठरू शकते, हे चालू वर्षात घडलेल्या अपघातांवरून लक्षात येईल. शहराच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान प्राणांतिक अपघाताच्या २०६ घटना घडल्या. यात १८३ पुरुष आणि ३५ महिलांना प्राण गमवावे लागले. या अपघातील मृत्यूचे विश्लेषण केले तर यात झालेले ७५ टक्के अपघातीमृत्यू हे दुचाकीस्वारांचे असल्याचे आढळले. गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण प्राणांतिक अपघाताच्या २६५ घटनांच्या तुलनेत यंदा २२ टक्क्यांची घट झाली. यातील ८० टक्क्यांहून अधिक अपघात हे मद्य प्राशनामुळे नव्हे तर वेगाच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याने झालेले आहेत.

वाहतूक शाखेने चालू वर्षामध्ये आतापर्यंत झालेल्या ३८२ प्राणघातक अपघाताच्या घटनांची नोंद घेतली. यात ३७३ पुरुष आणि ११९ महिला गंभीररित्या जखमी झाल्या. यातही सर्वांधिक अपघाताची संख्या ही दुचाकीस्वारांची आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३८१ घटना घडून ३७३ पुरुष आणि ११९ महिलांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या.किरकोळ अपघाताच्या संख्येत गेल्या वर्षीच्या २४७ घटनांच्या तुलनेत चालू वर्षात फक्त २ घटना कमी घडल्या. यात २४५ पुरुष आणि ११२ महिलांना किरकोळ दुखापती झाल्या.

शहरातल्या १० वाहतूक परिमंडळापैकी प्राणांतिक अपघाताच्या सर्वाधिक ५४ घटना एमआयडीसी हद्दीत घडल्या. यात ५२ पुरुष आणि ४ महिलांनी प्राण गमावले. याच हद्दीत गंभीर स्वरुपाच्या ५८ घटना घडल्याने ६५ पुरुष आणि १६ महिला जखमी झाल्या. त्या खालोखाल इंदौरात प्राणांतिक अपघाताच्या ३१ घटनांत ३२, कामठीत ३० घटनांमध्ये ३१ जण दगावले.

याच आधारावर एनसीआरबीच्या नोंदी तपासल्या तर दुचाकी वाहनांमुळे देशात २०२३ मध्ये सर्वाधिक प्राणघातक रस्ते अपघात झाल्याचे आढळले. यात ४५. ८ टक्के म्हणजे ७९,५३३ मृत्यू मृत्यू हे दुचाकीवरून झाले. त्या तुलनेत कारच्या अपघातातंमध्ये २४,७७६ म्हणजे १४. ३ टक्के मृत्यू झाले. त्यानंतर १५. ९ टक्के म्हणजे २७,५८६ पादचाऱ्यांचे मृत्यू झाले. दुचाकी वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक ११,४९० मृत्यू तामिळनाडूत तर उत्तर प्रदेश ८,३७० मृत्यू नोंदवले गेले.

मद्यापेक्षा अतिवेग जीवघेणा

देशात २०२३ मध्ये झालेल्या वाहतूक अपघातांच्या एकूण १ लाख ७३ हजार ८२३ मृत्यूपैकी १ लाख १ हजार मृत्यू हे वेग मर्यादा उल्लंघनातून झले आहेत. एकूण अपघातांच्या सरासरीत वेगमर्यादा उल्लंघन हे ५८ टक्के कारणीभूत आढळले. त्यातुलनेत अंमली पदार्थ अथवा मद्य प्राशन करून वाहन चालविल्याने झालेल्या अपघातांमध्ये ३ ६८८ जणांचा मृत्यू झाला. सरारीने हे प्रमाण जेमतेम २.१ टक्के आहे, असे एनसीआरबीच्या नोंदी म्हणतात.

सायंकाळी ६ ते ९ अपघात वेळ

देशभरातील रस्त्यांवर झालेल्या प्राणघातक अपघातांमागील वेळेच्या नोंदी तपासल्या तर ४,६४,०२९ घटनांमध्ये झालेले ९५,९८४ मृत्यू हे सायंकाळी सहा ते ९ या वेळेत नोंदवले गेले आहेत. जे एकूण रस्ते अपघातांच्या २०.७ टक्के आहे. २०२५मध्ये शहरात झालेल्या अपघाताच्या घटना आणि नागपूर वाहतूक शाखेच्या नोंदी तपासल्या तर सर्वाधिक प्राणघातक अपघात हे याच वेळेत नोंदवले गेले आहेत.

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर निर्बंध लावण्यासाठी ऑपरेशन यु टर्न राबवले जात असले तरी वाहनधारकांना शिस्त लागावी, हा त्यामागचा मूळ उद्देष आहे. त्यामुळे निश्चितच प्राणांतिक अपघातांची संख्या कमी झाली आहे. हे नाकारता येत नाही. -लोहित मतानी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा