नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, सर्वसामान्य नागरिकांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण या धक्क्यातून सावरलेला नाही. दादांच्या आठवणी, त्यांचे निर्णय, त्यांची कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. अशाच आठवणींना उजाळा देताना नागपूर जिल्ह्यातील एक भावनिक संकल्प सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“दादा मुख्यमंत्री होईपर्यंत केस कापणार नाही,” असा संकल्प नागपूर जिल्ह्यातील विलास झोडापे यांनी अजित पवार यांच्याप्रती असलेल्या अपार प्रेमातून केला होता. अजित पवार यांचे जिवलग सहकारी म्हणून ओळखले जाणारे झोडापे यांनी दादांच्या विचारांनाच आपल्या जीवनाचा पाया मानला होता. जनतेसाठी निस्वार्थपणे काम करणे, सत्याच्या मार्गावर ठाम राहणे आणि कोणालाही त्रास न देता संघटन उभे करणे, ही अजितदादांची शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान १८ डिसेंबर २०२३ रोजी झोडापे यांनी पत्नी आशा, मुलगा सत्यश्री व चैत्यश्री यांच्यासह अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीत दादांनी दिलेले प्रेमळ मार्गदर्शन आजही झोडापे कुटुंबीयांच्या स्मरणात कोरले गेले आहे. “लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करा. लोकच तुमचा सन्मान करतील. केस नंतर कापाल,” असे शब्द झोडापेंच्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.

करोना काळात कार्यकर्त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, संघटन मजबूत ठेवा, असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले होते. झोडापे यांनी ते काटेकोरपणे पाळले. अजितदादांच्या प्रत्येक वाढदिवशी घनरोपण करण्याची परंपरा त्यांनी पाऊस असो वा नसो, अखंडपणे जपली. उमरेड तालुक्यापुरतेच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ते अजितदादांवर निष्ठा ठेवणारे, प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने सावनेर शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ५ नोव्हेंबर २००५ रोजी पाणीपुरवठा, सिंचन व स्वच्छता मंत्री असताना त्यांनी सावनेरमधील पाणी टाक्या, गटार लाईन, सटवा माता मंदिर परिसर, कोच्छो धरण, कपिलेश्वर तलाव आदी अनेक विकासकामांना मंजुरी दिली होती. १ मे २०२२ रोजी त्यांनी पुन्हा सावनेरला भेट देत विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला होता.

उपमुख्यमंत्री असताना माजी मंत्री सुनिल केदार यांच्या आग्रहावरून नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या इमारतीचे उद्घाटन त्यांनी केले होते. ही आठवण सांगताना अनेक कार्यकर्त्यांचे डोळे आजही पाणावतात. “एक सच्चा मार्गदर्शक हरपला, मात्र त्यांचे विचार आणि आदर्श नेतृत्व कायम स्मरणात राहील,” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.