नागपूर : इराण व इस्रायल-अमेरिका युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. होमुर्झ सामुद्रधुनतून जहाज वाहतुकीवर इराणकडून निर्बंध घालण्यात आले आहे. शिवाय अनेक तेल निर्माण करणाऱ्या कंपन्याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांसह भारतावही झाला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. त्याच प्रमाणे एलपीजीच्या पुरवठाही कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य शासनाला एलपीजीचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पर्याय म्हणून केरोसिनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केरोसिनच्या कमिशनमध्ये ही वाढ केली आहे.
एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने कार्डधारकांना रेशन दुकानातून केरोसिन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पीएनजीच्या वापरावर भर देण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिकांना पीएनजी सक्तीचे करण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गॅस कंपनी व हॉटेल व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात २२ सोसायट्यांमध्ये पीएनजीची व्यवस्था
एलपीजीचा पुरवठा केंद्र सरकारकडून कमी करण्यात आला आहे. एलपीजीला पर्याय म्हणून केरोसिनसोबतच पीएनजीच्या वापरावर भर देण्यात येत आहे. गेलच्या माध्यमातून नागपूर ग्रामीण भागात एनपीजीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. २२ सोसायट्यांमध्ये पीएनजीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या सर्व बुटीबोरी, जामठा, वानाडोंगरी, मिहान व हिंगणा भागातील आहेत.
पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनपीजी संदर्भात व्हीसीच्या माध्यमातून बैठक घेतली. जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात २८ पीएनजी केंद्र आहेत. तर २२ सोसायटींमध्ये पीएनजीची व्यवस्था करण्यात आली आहे. पाईप लाईन असलेल्या भागातील हॉटेल व्यावसायिकांसाठी या पीएनजीचा वापर सक्तीचा करण्यात येईल. तशा सूचनाच केंद्राच्या आहेत.
एलपीजीच्या तुलनेत स्वस्त
पीएनजीचा वापर वाढल्यास एलपीजीची भार कमी होईल. त्याचप्रमाणे एलपीजीच्या तुलनेत पीएनजी स्वस्त आहे. व्यावसायिकांचे १० ते १५ खर्च वाचणार आहे. हॉटेल व्यावसायिकांना याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. सोमवारला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. बैठकीला गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांना बोलावण्यात येणार असल्याचे पडोळे यांनी सांगितले.
