नागपूर : रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ परिसर आणि मदतीसाठी कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक असते. मात्र, नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) सोमवारी सकाळी अचानक वेगळेच चित्र निर्माण झाले. वर्षानुवर्षे सेवा देणारे सुमारे ४५० कंत्राटी कर्मचारी एकाच वेळी कामबंद आंदोलनात उतरले. स्वच्छतेची कामे ठप्प झाली आणि रुग्णांना मदत करण्याची यंत्रणाही विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. पण, या अचानक संपामागचे नेमके कारण काय होते?
कर्मचारी अचानक संपावर का गेले?
एम्समधील स्वच्छता, मदतनीस आणि अन्य कामांची जबाबदारी सुमारे ४५० सॅनिटरी अटेंडंट्सवर आहे. हे कर्मचारी अनेक वर्षांपासून संस्थेत सेवा देत आहेत. आतापर्यंत या कामाचे कंत्राट शाश्वत सफल्य या कंपनीकडे होते. मात्र, कंपनीचा करार संपल्यानंतर कामाची जबाबदारी रजस एंटरप्रायजेस या नव्या कंपनीकडे सोपविण्यात आली. दोन्ही कंपन्या राज्याबाहेरील आहेत. नवीन कंपनीकडे कंत्राट गेल्यानंतर जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. रोजगार धोक्यात येण्याच्या शक्यतेने त्यांनी सोमवारी सकाळी प्रशासनाला सूचना देत कामबंद आंदोलन सुरू केले.
संपामुळे एम्समधील परिस्थिती काय झाली?
सुमारे ४५० कर्मचारी एकाच वेळी कामावरून दूर झाल्याने स्वच्छतेची कामे खोळंबली. विविध विभागांमध्ये अस्वच्छता वाढू लागली. रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतनीसांची सेवाही विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली. रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची चिन्हे दिसताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली?
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून बैठका घेण्यात आल्या. नवीन कंपनीकडे कंत्राट गेले असले तरी विद्यमान कर्मचाऱ्यांची सेवा कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
अखेर आंदोलन कधी मागे घेतले?
काही तासांच्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. त्यानंतर स्वच्छता आणि मदतनीसांची कामे पूर्ववत सुरू झाली. अचानक निर्माण झालेल्या पेचातून सुटका झाल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. मात्र, कंत्राटदार बदलताना जुन्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचे काय, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
