नागपूर : अन्नाचा साधा घासही गिळता येत नसल्याची कल्पनाही असह्य वाटावी अशी. पण नागपूरमधील २३ वर्षीय तरुणीसाठी तीच दोन वर्षांची कठोर वास्तवता होती. रासायनिक द्रव्य प्राशनामुळे पूर्णतः निकामी झालेली अन्ननलिका, झपाट्याने घटलेले वजन आणि मृत्यूच्या छायेत गेलेले आयुष्य या सर्वांवर मात करत अखेर एम्स नागपूरच्या डॉक्टरांनी तिला नवजीवन दिले.
तरुणीने २०२४ मध्ये रासायनीक द्रव्य प्राशन करताच तिच्या अन्ननलिका आणि वरच्या पचनसंस्थेला गंभीर इजा झाली. सुरुवातीला वेदना आणि गिळताना होणारी अडचण इतपत लक्षणे होती; परंतु काही महिन्यांतच परिस्थिती बिघडत अन्ननलिका आकुंचन पावत गेली आणि ती पूर्णतः बंद पडली. पोषणासाठी ट्यूब गॅस्ट्रोस्टोमी आणि फीडिंग जेजुनोस्टोमीचा आधार घ्यावा लागला.
मे २०२५ पर्यंत तिचे वजन अवघ्या १४ किलोवर आले होते. बीएमआय ५.५ अशा जीवघेणा स्तरावर येऊन तिला बसताही येत नव्हते. स्नायूंचा तीव्र क्षय आणि कुपोषणामुळे शरीर क्षीण झाले होते. अशा स्थितीत तिची एम्समध्ये भरती करण्यात आली. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन तिला बीपीएल गटात समाविष्ट करून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार सुरू झाले.
दरम्यान एम्समध्ये पीएमआर विभागाचे डॉ. हर्षानंद यांच्या नेतृत्वाखाली आठ महिन्यांचा काटेकोर कार्यक्रम आखण्यात आला. जनरल मेडिसिन विभागातील डॉ. ओंकार यांचे वैद्यकीय मार्गदर्शन, मनोचिकित्सा विभागाची समुपदेशन मदत, आहारतज्ज्ञांचा संतुलित पोषण आराखडा आणि नियमित फिजिओथेरपी या सर्वांचा एकत्रित परिणाम दिसू लागला. हळूहळू ती उभी राहून चालू लागली.
दिवसाला चार ते सहा हजार पावले चालण्याइतकी ताकद परत आली. शस्त्रक्रियेपूर्वी वजन २४ किलोपर्यंत पोहोचले. १२ जानेवारी २०२६. रोजी बरेच तास शस्त्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेत सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी पथकाने मोठ्या आतड्याच्या एका भागाचा उपयोग करून अन्ननलिकेचे पुनर्निर्माण केले. छातीतील उरोस्थीखाली मार्ग तयार करून तो भाग बसवण्यात आला.
मान आणि पोटाच्या भागात चार महत्त्वाचे ‘एनास्टोमोसिस’ करून पचनसंस्थेची सलगता पुनर्स्थापित करण्यात आली. भूलतज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागानेही तितक्याच दक्षतेने साथ दिली. शस्त्रक्रियेनंतर तिला काही पदार्थ तोंडाद्वारे देणे सुरू झाले. त्यानंतर काही दिवसांनी तिचे वजन
काही प्रमाणात वाढून ती ती स्वतः चालते, बोलते आणि हसणेही सुरू झाली.
पुढील काही महिन्यात ती नियमित आहार तोंडाद्वारे खालू शकणार असल्याचा डाॅक्टरांना विश्वास आहे. एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी या यशस्वी उपचारासाठी सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीसह सर्व संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

