नागपूर : नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर (एम्स) येथील पदवीधर विद्यार्थ्यांच्या मेसमधील जेवणात किडे व सुरवंट आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांत संतापाची लाट उसळली असून मेसच्या गुणवत्तेबाबत तसेच एकूणच व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एम्समधील या घटनेमुळे केवळ मेसच्या गुणवत्तेवरच नव्हे, तर देशातील अग्रगण्य वैद्यकीय शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या एम्सच्या एकूणच व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पारदर्शक चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जेवणात आक्षेपार्ह घटक?

बुधवारी दुपारच्या जेवणावेळी काही विद्यार्थ्यांना भाजीमध्ये पूर्णपणे तळलेला सुरवंट दिसल्याचा दावा करण्यात आला. फळांच्या तुकड्यावर मृत किडा आढळल्याचे, तर एका भाजीपदार्थात माशीसदृश घटक दिसल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मशरूम करीमध्ये ‘स्पंजसदृश’ पदार्थ आढळल्याचा आरोपही करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार लक्षात येताच जेवण सोडून दिले, तर काहींनी आधीच जेवण घेतल्याचे सांगितले. या संदर्भातील छायाचित्रे आणि संदेश विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप गटांवर व्हायरल झाले असून, ‘मांसाहारी’ पदार्थात नेमके काय मिसळले जात आहे, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

सुविधांची कमतरता?

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, कॅम्पसमधील मेसमध्ये दोनच डायनिंग टेबल असून प्रत्येकी सुमारे ७० विद्यार्थी बसू शकतात. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही व्यवस्था अपुरी असल्याची तक्रार आहे. गर्दी, घाईगडबड आणि देखरेखीअभावी अन्नाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. विशेष म्हणजे, मेसचा करार नुकताच बदलून १ फेब्रुवारीपासून नव्या कंत्राटदाराकडे देण्यात आला आहे. नव्या व्यवस्थेमुळे दर्जेदार आणि स्वच्छ अन्न मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. मात्र या घटनेनंतर उलट असंतोष वाढला आहे.

एम्स प्रशासन काय म्हणते ?

एम्सचे अधिष्ठाता (स्टुडंट वेलफेअर) डॉ. सिद्धार्थ दुभाषी यांनी प्रसिद्धिमध्यमांना सांगितले की, मेसचे कंत्राट १ फेब्रुवारीपासून नव्या कंत्राटदाराला देण्यात आले असून सर्व नियमांचे पालन करूनच मेस चालवली जाते. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते आणि दररोज रात्री संपूर्ण किचन व मेस परिसराची स्वच्छता केली जाते. “जिथे विद्यार्थी जेवतात, तिथेच विभागप्रमुखही जेवण करतात. त्यामुळे जेवणात किडे आढळल्याचा प्रकार खोडसाळपणातून झाला असावा, अशी शंका आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.