नागपूर : एम्स येथील पदवीधर विद्यार्थ्यांच्या मेसमधील जेवणात किडे आढळल्याची छायाचित्रे बुधवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न शाखेचे दोन सदस्यीय पथक गुरुवारी एम्समध्ये धडकले. त्यांच्या पाहणी दरम्यान मेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा तपासणी अहवाल उपलब्ध नसणे, फरशा निघालेल्या असणे यासह इतरही काही त्रुटी आढळल्या. पथकाने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला. सोबत विद्यार्थ्यांना तक्रारीसाठी पुढे .येण्याचे आवाहन केले.

एफडीएच्या पथकात किरण गेडाम यांच्यासह एका अन्य अधिकाऱ्याचा समावेश होता. सकाळी अकराच्या सुमारास पथकाने थेट विद्यार्थ्यांची मेस गाठली. कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले असता ते सादर करण्यात आले नाही. त्यानंतर स्वयंपाकघराची पाहणी केली असता धूरनिस्सारणासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती, वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे तपासणी प्रमाणपत्र नव्हते , काही भागांतील फरशा निघालेल्या आढळून आल्या. पथकाने विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधला. सुरुवातीला मेस चालकाविरोधात तक्रार नसल्याचे सांगण्यात आले; मात्र तक्रारी असल्यास पुढे यावे आणि नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्रुटींबाबत कंत्राटदाराला दोन दिवसांत दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये,अशी समज देण्यात आल व परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला.

पथकाने एम्समधील अधिकाऱ्यांकडून मेस पुरवठादारासोबतच्या कराराची कागदपत्रे मागवली. समाजमाध्यमांवर प्रसारित छायाचित्रांबाबत माहितीही घेतली. प्रशासनाकडून अनेक अधिकारीही याच मेसमध्ये भोजन करतात, असे सांगण्यात आले. येथे भोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध सुविधा याबाबतही माहिती घेण्यात आली.

एम्समधील मेसचे प्रकरण काय?

एम्सच्या मेसमधील पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणात किडे आढळल्याची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती.काही विद्यार्थ्यांनी अन्न सेवन केल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे सांगितले जाते. याप्रकारामुळे मेसमधील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, एम्सचे अधिष्ठाता (विद्यार्थी कल्याण) डॉ. सिद्धार्थ दुभाषी यांनी मेसचे कंत्राट १ फेब्रुवारीपासून नव्या कंत्राटदाराकडे देण्यात आल्याचे स्पष्ट केले. सर्व नियमांचे पालन करूनच मेस चालवली जाते आणि व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवले जाते, असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी विद्यार्थी जेवतात, त्याच ठिकाणी विभागप्रमुखही भोजन करतात, त्यामुळे जेवणात किडे आढळल्याचा प्रकार खोडसाळपणाचा असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या दिवशीही जेवणात किडा ?

एम्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी जेवणात किडा आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्याबाबतचे छायाचित्र आणि संदेश विद्यार्थ्यांनी एम्सच्या एका व्हाट्सअप वर प्रसारित केले. परंतु, एम्स प्रशासनाची खात्री झाल्यावरच जेवणात किडा आढळला का हे स्पष्ट होणार आहे.