नागपूर : पक्षाघात किंवा मेंदू-मज्जारज्जूच्या दुखापतीनंतर चालण्याची क्षमता गमावलेल्या रुग्णांसाठी नागपूर ‘एम्स’मध्ये आधुनिक उपचाराची नवी सुविधा सुरू झाली आहे. रोबोटिक प्रणालीच्या मदतीने पुन्हा चालण्याचा नियंत्रित सराव, तर चुंबकीय स्पंदनांच्या साहाय्याने मेंदूच्या पुनर्वसनाला मदत करणारे तंत्र येथे उपलब्ध झाले आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णाच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव तयार करण्यापासून ते बसविण्यापर्यंतची सुविधाही आता एकाच ठिकाणी मिळणार आहे.
रोबोट रुग्णाला पुन्हा चालायला कसा मदत करणार?
उभे राहणे किंवा चालणे कठीण झालेल्या रुग्णाला रोबोटिक चाल प्रशिक्षण प्रणाली नियंत्रित आधार देते. त्याद्वारे सुरक्षित वातावरणात वारंवार चालण्याचा सराव करता येतो. रुग्णाची क्षमता आणि पुनर्वसनाचे उद्दिष्ट पाहून रोबोटकडून मिळणाऱ्या आधाराचे प्रमाण कमी-अधिक करता येते.
कोणत्या रुग्णांना या सुविधेचा फायदा होऊ शकतो?
पक्षाघात, मज्जारज्जूची दुखापत, मेंदूला झालेली गंभीर दुखापत, सेरेब्रल पाल्सी तसेच चालण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या अन्य आजारांतील निवडक रुग्णांसाठी हे तंत्र वापरता येणार आहे.
मेंदूच्या पुनर्वसनासाठी चुंबकीय स्पंदने कशी वापरणार?
‘रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन’ अर्थात ‘आरटीएमएस’मध्ये मेंदूच्या विशिष्ट भागांवर नियंत्रित चुंबकीय स्पंदने दिली जातात. निवडक रुग्णांमध्ये मेंदूच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्रचना प्रक्रियेला मदत करण्यासाठी हे तंत्र वापरले जाऊ शकते.
पारंपरिक उपचार बंद होणार का?
नाही. आरटीएमएस आणि रोबोटिक प्रणाली हे पारंपरिक पुनर्वसनाला पर्याय नाहीत. भौतिकोपचार, व्यवसायोपचार आणि वाचा उपचारांसह रुग्णाच्या गरजेनुसार त्यांचा पूरक वापर केला जाणार आहे.
कृत्रिम अवयवांसाठी काय सुविधा सुरू झाली?
रुग्णाचे मूल्यमापन, कृत्रिम अवयव तयार करणे, बसविणे, आवश्यक बदल, वापराचे प्रशिक्षण आणि पुढील देखरेख आता ‘एम्स’मध्येच करता येईल. नव्या सुविधेच्या उद्घाटनावेळी सहा रुग्णांना कृत्रिम पाय देण्यात आले.
नवी सुविधा कोणी सुरू केली?
आमदार डॉ. आशिष देशमुख आणि विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रा. डॉ. प्रशांत पी. जोशी, प्रा. डॉ. रसिका गडकरी, डॉ. निलेश नागदेवे, डॉ. स्वप्नील पी. सोनुने, डॉ. हर्षानंद पोपलवार आणि डॉ. रोहित गायकर उपस्थित होते. कृत्रिम अवयव निर्मितीत प्रफुल्ल ठाकरे, रवी रंजन आणि गुंजन चौधरी यांचा सहभाग आहे.
