नागपूर : गेल्या वर्षांत या विमानतळावरून हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने नियंत्रित केलेल्या विमानांची आकडेवारी बघता नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची मध्य भारतातील महत्त्वाचे हवाई केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने (एटीसी) वाढत्या हवाई वाहतुकीचे नियोजनबद्ध नियंत्रण करत उत्तम कामगिरी बजावली आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार २०२४ हे वर्ष सर्वाधिक विमान नियंत्रणाचे ठरले असून या कालावधीत एकूण ५ लाख ८५ हजार ५०५ विमान हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.
वर्षानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत १ लाख २९ हजार ४१० विमानांचे नियंत्रण करण्यात आले. त्यानंतर २०२३ मध्ये ही संख्या ५ लाख ४० हजार ३३९ वर पोहचली. २०२४ मध्ये त्यात आणखी वाढ होत ५ लाख ८५ हजार ५०५ इतकी विक्रमी नोंद झाली. तर २०२५ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतच १ लाख ५३ हजार २१२ विमानांवर नियंत्रण ठेवण्यात आले.
२०२५ मधील विमान हालचालींच्या तपशिलानुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूर विमानतळावरून एकूण १३ हजार ३७५ विमानांचे उड्डाण झाले. तसेच १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एटीसीने जानेवारीत ५१ हजार १६०, फेब्रुवारीत ५० हजार ९५२ आणि मार्चमध्ये ५१ हजार १०० अशा मोठ्या प्रमाणावर विमान हालचालींवर नियंत्रण ठेवले.
‘टर्मिनल व एन-रूट’ नियंत्रणातही नागपूर एटीसीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ५२ हजार २५३ टर्मिनल मूव्हमेंट्स नियंत्रित करण्यात आल्या. तसेच १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ७ लाख ७ हजार १५८ ‘एन-रूट मूव्हमेंट्स’वर नियंत्रण ठेवण्यात आले.
दरम्यान, बाहेरील ठिकाणांहून येणाऱ्या विमानांना नागपूर विमानतळावर लँडिंग नाकारल्याबाबत कोणतीही स्वतंत्र नोंद उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. वाढत्या हवाई वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एटीसीकडून काटेकोर समन्वय, तांत्रिक दक्षता आणि नियोजनबद्ध नियंत्रणामुळे ही वाढ सुरळीतपणे हाताळता आली असल्याचेही प्राधिकरणाने नमूद केले.

