नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या इंधन दरांमुळे आणि विमान कंपन्यांच्या वाढत्या परिचालन खर्चामुळे नागपूर विमानतळावरून विविध शहरांकडे जाणाऱ्या अनेक विमानफेऱ्या १ जूनपासून रद्द किंवा कमी करण्यात येत असून प्रवाशांना कमी पर्याय आणि वाढीव भाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबई मार्गावरील फेऱ्यांना ब्रेक
नागपूर विमानतळावरील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई मार्गावर एअर इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सकाळ व सायंकाळच्या नियमित विमानफेऱ्या १ जून ते ३१ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, शासकीय आणि वैयक्तिक कारणांसाठी प्रवास होत असतो. विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि व्यावसायिक हालचालींमुळे जून-जुलैमध्ये प्रवाशांची संख्या वाढलेली असते. त्यामुळे या कपातीचा थेट परिणाम हजारो प्रवाशांवर होणार आहे.
टिअर-२ शहरांवरील सेवेत घट
वाढत्या खर्चाचा फटका टिअर-२ शहरांमधील विमानसेवांनाही बसू लागला आहे. इंडिगोने हैदराबाद-नागपूर-हैदराबाद मार्गावरील विमानसेवा तसेच नागपूर-गोवा मार्गावरील दर बुधवारी होणारी फेरी रद्द केली आहे. याशिवाय कोलकाता-नागपूर मार्गावरील काही उड्डाणे बंद करण्यात आली असून अहमदाबाद आणि इंदूर मार्गावरील विमानफेऱ्यांची वारंवारताही कमी करण्यात आली आहे. पूर्वी कोलकाता-नागपूर मार्गावर दररोज चार उड्डाणे उपलब्ध होती; मात्र आता ती संख्या दोनवर आली आहे.
बंगळुरू मार्गालाही फटका
नागपूर-बंगळुरू मार्गावरील विमानसेवेतही लक्षणीय कपात करण्यात आली आहे. इंडिगोने या मार्गावरील दोन उड्डाणे रद्द केली असून एअर इंडिया एक्सप्रेसने चार विमानफेऱ्या बंद केल्या आहेत. काही नवीन उड्डाणे सुधारित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यात येणार असली तरी एकूण उपलब्ध सेवांमध्ये घट झाली आहे. परिणामी, या मार्गावर पूर्वी दररोज धावणाऱ्या १२ विमानांऐवजी आता केवळ ८ विमानांची सेवा उपलब्ध राहणार आहे.
भाडेवाढीची शक्यता वाढली
विमानफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने उपलब्ध आसनसंख्येवर परिणाम होणार असून त्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत कंपन्या खर्च नियंत्रणासाठी उड्डाणांची संख्या कमी करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. आगामी काळात प्रवाशांना कमी पर्याय, वाढलेले भाडे आणि आगाऊ आरक्षणाची गरज अशा दुहेरी-तिहेरी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
