नागपूर – नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तेथे रविवारी सकाळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. गोव्याला जाण्यास सज्ज असलेल्या इंडिगो च्या विमानाच्या ‘नोज व्हील’जवळ अचानक इंधन गळती सुरू झाल्याचे आढळल्याने उड्डाण तातडीने थांबविण्यात आले. सर्व प्रवासी विमानात बसलेले असतानाच ही बाब निदर्शनास आली. वैमानिकाने तत्काळ प्रसंगावधान राखत विमान परत पार्किंग बेमध्ये आणले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे काही काळ विमानतळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टेक-ऑफपूर्वीच धोक्याची चाहूल
नागपूर ते गोवा या मार्गावरील (6E 6049) विमान सकाळी उड्डाणासाठी सज्ज होते. प्रवासी बसल्यानंतर विमान धावपट्टीकडे सरकत असताना तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या लक्षात पुढील चाकाजवळ इंधन गळती होत असल्याचे आले. ही बाब गंभीर मानत तात्काळ वैमानिकाला कळवण्यात आली.
वैमानिकाचे प्रसंगावधान
सूचना मिळताच वैमानिकाने कोणताही धोका न पत्करता विमान थांबवले आणि ते पुन्हा पार्किंग बेमध्ये आणले. त्यानंतर नियोजित पद्धतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आले. या जलद निर्णयामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे मानले जात आहे.
विमान ‘ग्राउंडेड’, तपासणी सुरू
घटनेनंतर संबंधित इंडिगो विमान नागपूर विमानतळावरच ग्राउंड करण्यात आले. तांत्रिक पथकाकडून सखोल तपासणी सुरू असून दोष दूर होईपर्यंत विमान उड्डाणासाठी वापरण्यात येणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
इतर उड्डाणांवर परिणाम
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम इतर उड्डाणांवरही झाला. गोवा आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. विशेषतः मुंबईच्या फ्लाइटला साडेसहा तास उशीर झाला, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली.
पर्यायी व्यवस्थेतून दिलासा
प्रवाशांचा वाढता संताप लक्षात घेऊन इंडिगो ने पर्यायी विमानाची व्यवस्था केली. सुमारे २३६ आसनी क्षमतेचे मोठे विमान मागवून दोन फ्लाइटमधील प्रवाशांना एकत्रितपणे रवाना करण्यात आले. अखेरीस रात्री उशिरा सर्व प्रवाशांना मुंबईकडे पाठवण्यात आले, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
