नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी जीएमआर एअरपोर्ट्सने ३०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह बहुपदरी विकास आराखडा जाहीर केला आहे. आठ वर्षांत विमानतळाला जागतिक दर्जाचे प्रवासी, कार्गो आणि लॉजिस्टिक्स केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट आहे.
खासगीकरणानंतर विकासाला वेग
नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने २५ जून २०२६ रोजी सुमारे एक हजार हेक्टर जमीन जीएनआयएएलकडे सुपूर्द केली. त्यानंतर विमानतळाच्या संचालनासह दीर्घकालीन विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू झाली. जीएमआर एअरपोर्ट्सने या प्रकल्पासाठी प्रारंभी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे.
प्रवासी क्षमता दहापट वाढविण्याचे लक्ष्य
३० वर्षांच्या ‘कन्सेशन’ कालावधीत विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सध्याच्या ३० लाखांवरून तीन कोटींपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध जागेचा विचार करता भविष्यात ही क्षमता पाच कोटी प्रवाशांपर्यंत वाढविण्याचीही शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विद्यमान टर्मिनलचे नूतनीकरण, अतिरिक्त चेक-इन काउंटर, सेल्फ-चेक-इन किऑस्क, नव्या सुरक्षा लेन्स, सुधारित स्वच्छतागृहे, स्वतंत्र लाउंज आणि बस बोर्डिंग गेट्सची संख्या वाढविण्यात येणार आहे.
कार्गो हब आणि एरोसिटीची उभारणी
भारताच्या मध्यवर्ती भौगोलिक स्थानाचा आणि मिहान प्रकल्पाचा लाभ घेत नागपूरला प्रमुख कार्गो व लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करण्याचा आराखडा आहे. दीर्घकालीन टप्प्यात वार्षिक दीड लाख मेट्रिक टन कार्गो हाताळणीची क्षमता विकसित केली जाणार आहे. हस्तांतरित एक हजार हेक्टरपैकी सुमारे १०० हेक्टर क्षेत्र एरोसिटीसाठी राखीव ठेवण्यात आले असून व्यावसायिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
दुसरी धावपट्टी, नवीन टर्मिनल आणि हरित विकासावर भर
दुसऱ्या टप्प्यात वार्षिक ४० लाख प्रवासी क्षमतेचे नवीन एकात्मिक टर्मिनल, कार्गो टर्मिनल, इंधन सुविधा, विस्तारित वाहनतळ आणि व्यावसायिक विकास प्रस्तावित आहे. पाचव्या ते आठव्या वर्षात दुसरी धावपट्टी, नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, स्वतंत्र वीज व जलपुरवठा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. हरित ऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि व्यापक हरितीकरणाला विकास आराखड्यात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. जीएमआर समूहाचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर यांनी नागपूरला भविष्याभिमुख, शाश्वत आणि जागतिक दर्जाचे विमान वाहतूक केंद्र बनविण्याची भूमिका मांडली, तर नागपूर विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी हा प्रकल्प प्रवासी अनुभवात आमूलाग्र बदल घडविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
