नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताली असलेल्या ६३ उंच इमारती विमान उतरवताना आणि उड्डाण घेताना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणने या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावली आहे. परंतु, अद्यापही यासंदर्भाने सुरक्षेविषयी दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे.

अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी झेपावल्याच्या काही मिनिटांत विमान कोसळले. ते विमानतळ परिसरातील वैदयकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर पडले. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाच्या सभोवतला असलेल्या उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिहान प्रकल्पाचा अविभाज्य भाग असलेल्या कार्गो हबसाठी नागपूर विमानतळावर दोन धावपट्टी असणे आवश्यक आहे. त्यासाठी खासगी विकासकाकडून या विमानतळाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. ‘जीएमआर’ला हे काम मिळाले आहे.

विमानतळ विस्ताराचा प्रकल्प ७ हजार कोटींचा आहे. या प्रकल्पाचे चार टप्प्यात काम होणार असून यामध्ये दोन धावपट्टीच्या कामाचा समावेश आहे. विमानतळ विस्तार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनियंत्रित विकास अडथळा ठरू पाहतो आहे. विमानतळ परिसरात सुमारे ६८ उंच इमारतींमुळे विमान उतरवताना आणि उड्डाण घेताना त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे. त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून त्यापैकी पाच इमारतींची उंची कमी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही ६३ इमारती धोका क्षेत्रात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २० किलोमीटरपर्यंत येणाऱ्या प्रभावित क्षेत्रातील ६३ उंच इमारती आहे. प्रभावित क्षेत्रातील इमारतींची ५५ मीटर उंचीची मर्यादा आहे. या क्षेत्रातील इमारतींच्या बांधकामांना भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. विमानतळाभोवतालच्या २० किलोमीटर क्षेत्रातील इमारतींना स्थानिक नगर नियोजन प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना प्राप्त करण्यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतीच्या उंची संदर्भातील वैध ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य आहे. हवाई क्षेत्रातील संभाव्य अडथळे टाळण्याकरिता उंचीची मर्यादा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने निश्चित केली आहे.