नागपूर : वंदे भारत एक्स्प्रेससारख्या आधुनिक प्रवासी रेल्वेगाड्यांपुरती वातानुकूलित चालक कॅबची सुविधा मर्यादित न राहता आता मालगाडीच्या इंजिन चालकांनाही तिचा लाभ मिळत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी इलेक्ट्रिक लोको शेडने इंजिनांमध्ये वातानुकूलित चालक कॅब बसवण्याचा प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १९६ विद्युत इंजिनांमध्ये एसी कॅबची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून डिसेंबर २०२७ पर्यंत सर्व इंजिनांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.
३१२ तीन-फेज विद्युत इंजिनांचा ताफा
रेल्वेच्या आधुनिकीकरणाबरोबरच कर्मचारी कल्याणालाही प्राधान्य देण्याच्या धोरणातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अजनी इलेक्ट्रिक लोको शेडकडे सध्या ३१२ तीन-फेज विद्युत इंजिनांचा ताफा असून त्यामध्ये ७३ मेल-एक्स्प्रेस आणि २३९ मालगाडीच्या इंजिनांचा समावेश आहे. देशभरातील विविध हवामानात धावणाऱ्या या इंजिनांच्या चालकांना उन्हाळ्यात ४२ ते ४९ अंश सेल्सिअस तापमानासह इंजिनातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व इंजिनांमध्ये वातानुकूलित चालक कॅब बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन टन क्षमतेचे वातानुकूलित यंत्र
आतापर्यंत १९६ इंजिनांमध्ये एसी कॅब बसवण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित इंजिनांसाठी आवश्यक साहित्याची खरेदीही पूर्ण झाली आहे. प्रत्येक चालक कॅबमध्ये दोन टन क्षमतेचे वातानुकूलित यंत्र बसवण्यात आले आहे. स्वयंचलित तापमान नियंत्रण प्रणालीसह बाहेरील तापमान १९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास उबदार हवा पुरवणारी हिटिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभर चालकांना अनुकूल वातावरणात काम करता येणार असून रेल्वे संचालनाची सुरक्षितता आणि कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे.
झेंड्यांऐवजी एलईडी सिग्नलची सुविधा
चालक आणि सहायक चालकांना स्टेशन कर्मचाऱ्यांशी खिडकी न उघडताही संकेतांची देवाणघेवाण करता यावी यासाठी एलईडी सिग्नल एक्स्चेंज दिव्यांची सुविधा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कॅबमधील तापमान कायम राखण्यास मदत होत असून पारंपरिक लाल-हिरव्या झेंड्यांच्या वापराची गरजही कमी झाली आहे.
